भारतीय क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाची ताकद अलिकडच्या ७-८ वर्षांच्या काळात चांगलीच वाढत आहे, असे चित्र सध्या बघायला मिळत आहे. यंदाच्या २०२५-२६च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेवर बलाढ्य विदर्भ संघाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जेतेपदाची मोहर उमटवून आपली वाढती ताकद भारतीय क्रिकेटजगताला दाखवून दिली. एका जमान्यात हाच संघ रणजी स्पर्धेतील साखळी सामन्यांची औपचारिकता पूर्ण करायचा. मध्य विभागात समावेश असलेल्या विदर्भ संघाचे दोन-तीन रणजी सामने झाले की, त्यांचा क्रिकेट मौसम संपायचा, असे चित्र सुरुवातीच्या काळात बघायला मिळत होते. भारतातील एक कमकुवत संघ म्हणूनच विदर्भ संघाची ओळख होती. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विदर्भाधी कोणी फारशी दखलदेखील घेत नव्हते.
सुरुवातीच्या काळात विदर्भ संघ मध्य प्रांत म्हणून ओळखला जायचा. या स्पर्धेतील पहिला रणजी सामना विदर्भ संघ १९५७-५८ साली खेळला. या स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना तब्बल ५० वर्षांपेक्षा जास्त काळ वाट बघावी लागली. २०१७-१८ साली त्यांनी प्रथमच अंतिम फेरी गाठून दिल्ली संघाला नमवून आपले पहिले जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. त्यानंतर मग विदर्भ संघाने मागे बघितलेच नाही. परंतु गेल्या सात-आठ वर्षाच्या काळात हे चित्र बदललेले बघायला मिळत आहे. बलाढ्य संघांना नमवून आपण या स्पर्धेचे विजेतेपद मिळवू शकतो, हा नवा आत्मविश्वास अलिकडच्या काळात त्यांच्या खेळाडूंनमध्ये बघायला मिळतोय. गेल्या सात वर्षांत त्यांनी या मानाच्या स्पर्धेत तीनवेळा जेतेपद पटकावले. तर एकदा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाची रणजी स्पर्धा जिंकून विदर्भाने भारतीय क्रिकेटमधील आपली ताकद काय आहे हे दाखवून दिले. तसेच त्यांचा अनुभवी गोलंदाज निवृत्त होणाऱ्या अक्षय वाखरेला जेतेपदाची आगळी भेट दिली.
अंतिम सामन्यात यंदा प्रथमच या स्पर्धेची निर्णायक फेरी गाठणाऱ्या केरळचा पहिल्या डावातच आघाडीच्या जोरावर पराभव करुन गतवर्षी हुकलेले विजेतेपद यंदा विदर्भ संघाने खेचून आणले. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विदर्भने पहिल्या डावात ३७९ धावांची मोठी मजल मारली. त्यांच्या मलवारने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे त्यांना मोठी मजल मारता आली. मलवारला करुण नायरने ८६ धावांची चिवट खेळी करुन चांगली साथ दिली. या दोघांनी ४थ्या विकेटसाठी २१५ धावांची भक्कम भागिदारी करुन विदर्भ संघाला सावरले. विदर्भ संघाच्या पहिल्या डावातील ३७९ या धावसंख्येला उत्तर देताना केरळचा पहिला डाव ३४२ धावांत संपला. तेथेच विदर्भाचे तिसरे जेतेपद निश्चित झाले. केरळचा कर्णधार बेबीने ९८ धावांची झुंजार खेळी करुन आपल्या संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. सरवटे ७९ धावा, याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांची साथ कर्णधाराला मिळाली नाही. तेथेच पहिल्या जेतेपदाचे केरळ संघाचे स्वप्न भंग पावले. दर्शन, दुबे, वाखरे यांनी प्रत्येकी ३ बळी घेऊन केरळ संघाला पहिल्या डावातील आघाडीपासून रोखण्यात यश मिळविले.

विदर्भने दुसऱ्या डावात सामन्याची औपचारिकता पूर्ण करताना ९ बाद ३७५ धावांची मजल मारली. पहिल्या डावात शतक हुकलेल्या करुण नायरने १३५ धावा केल्या तर पहिल्या डावातील शतकवीर मलवारने ७९ धावांची सुरेख खेळी केली. मलवारला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. हर्ष दुबेने विक्रमी ६५ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने बिहारच्या अशुतोष अमनचा अगोदरचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडला. त्याने अष्टपैलू खेळ करताना ४७४ धावांदेखील केल्या. त्याची स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेत सर्वाधिक धावा यश राठोडने (१६०) केल्या. त्यामध्ये ५ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. यंदाच्या स्पर्धेत सर्व सामने जिंकणारा विदर्भ हा एकमेव संघ होता. साखळी लढतीत ७ सामन्यात ४० गुण मिळवून नव्या विक्रमाची नोंददेखील विदर्भ संघाने केली.
साखळी सामन्यात याअगोदर कुठल्याच संघाला एवढे गुण मिळवता आले नव्हते. उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्या तामिळनाडूला नमवून विदर्भाने उपांत्य फेरी गाठली तर उपांत्य फेरीत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला नमविण्याचा पराक्रम विदर्भ संघाने करुन रुबाबात चौथ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या विजयाबरोबरच विदर्भाने दोन वर्षांपूर्वी झालेल्या अंतिम फेरीतील आपल्या पराभवाचा बदलादेखील घेतला. खेळाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या प्रमुख दोन अंगात विदर्भ संघाने चांगलीच चमक दाखवून जेतेपदाला गवसणी घातली. जुन्या आणि नव्या खेळाडूंचा भरणा असलेला विदर्भ संघ समतोल होता. कर्णधार अक्षय वाडकरने आपल्या नेतृत्त्त्वाची छान चमक दाखवली. खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. आपण जिंकू शकतो हे त्याने खेळाडूंमध्ये भिनवण्यात यश मिळवले. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर विदर्भ संघाचा खेळ अधिक उंचावत गेला. प्रत्येकाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीनुसार सुरेख खेळ करून संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ तरवला.
प्रशिक्षक उस्मान गनी यांचादेखील विजयात मोठा वाटा आहे. त्यांनी खेळाडूंकडून अथक मेहनत आणि परिश्रम करून घेतले. नवे डावपेच आखले. खेळाडूंच्या फिटनेसवर जास्त भर दिला. तसेच शिस्तीमध्ये कुठलीही तडजोड केली नाही. युवा खेळाडूंनादेखील संधी देऊन त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण केली. विदर्भ क्रिकेट संघटनेनेदेखील गनी मांना पूर्ण मोकळीक दिली. तसेच खेळाडूंसाठी सर्व उच्च दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. उत्तम सपोर्ट स्टाफदेखील त्यांच्या मदतीला होता. गनी त्यांच्या ज्युनियर क्रिकेट संघाचेदेखील मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याचाही फायदा विदर्भ संघाला मिळाला. भक्कम फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजी या जोरावरच विदर्भ संघाने हे यश मिळवले. जूनपासूनच संघाने जोरदार सरावाला प्रारंभ केला. त्याचा मोठा लाभ विदर्भ संघाला मिळाला. जास्तीतजास्त युवा खेळाडूंना संधी देण्याची संघ व्यवस्थापनाची चाल यशस्वी ठरली.

या स्पर्धेत प्रत्येक संघाला ३ पाहुणे खेळाडू घेण्याची मुभा असते. विदर्भाने पाहुणे खेळाडू म्हणून दिल्लीचा सलामीवीर ध्रुव शौरी आणि केरळचा अष्टपैलू करुण नायर यांना आपल्या संघात दाखल केले. त्यांची निवड सार्थ ठरली. सुरुवातीला जेव्हा विदर्भाने दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा मुंबईकर वासिम जाफर आणि कर्नाटकचा सतीश गणेश यांना पाहुणे खेळाडू म्हणून घेतले होते. त्यांचे मोठे योगदान तेव्हाच्या विजयात होते. वासिम जाफरचा मोठा अनुभव विदर्भासाठी कामी आला. भारताचे माजी यष्टीरक्षक मुंबईकर असलेल्या चंद्रकांत पंडित यांनी २०१७-१८मध्ये विदर्भ संघाची मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर सलग २ वर्षे विदर्भ संघाने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. चंदू पंडित यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे विदर्भ संघाला एक नवी झळाळी मिळाली. पंडित-जाफर यांनी केमिस्ट्री तेव्हा यशस्वी ठरली होती. पंडित यांचे गेम प्लॅनिंग निर्णायक ठरले होते. प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे ओळखून त्यावर कशी मात करायची हे पंडित यांनी विदर्भ संघातील खेळाडूंना दाखवून दिले. खेळाडूंची बलस्थानं ओळखून त्यांचा खेळ अधिक उंचावण्यात पंडित यशस्वी झाले. विजयाची चव चाखायला पंडित यांनीच शिकवले.
विदर्भ संघाच्या या यशात त्यांचा माजी वेगवान गोलंदाज प्रशांत वैद्य याचेदेखील मोठे योगदान आहे. संघबांधणीसाठी त्यांनी तब्बल १५ वर्षे मोठे प्रयत्न केले. त्यांच्याच पुढाकाराने भारतातील पहिल्या निवासी क्रिकेट अकादमीची सुरूवात विदर्भात झाली. त्यासाठी संपूर्ण विदर्भ पालथा घालुन वैद्य यांनी या अकादमीसाठी युवा क्रिकेटपटू शोधून आणले. त्याच अकादमीतील जवळजवळ ७० टक्के खेळाडू पुढे विदर्भ संघातर्फे खेळले. तेव्हाचे विदर्भ क्रिक्रेट संघटनेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी वैद्य यांना मोलाची साथ दिली. त्याचे चांगले रिझल्ट विदर्भ संघाला मिळाले. दानिश मलवार, हर्ष दुबे, यश राठोड या युवा खेळाडूंनी या स्पर्धेवर यंदा आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. दुर्दैवाने बीसीसीआयच्या निवड समितीने अद्याप विदर्भ क्रिकेट संघातील खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेतली नाही. परंतु भविष्यात लवकरच निवड समिती दखल घेऊन विदर्भ संघातील खेळाडूंना भारतीय संघात स्थान देतील, अशी आशा करूया. आगामी २०२६-२७च्या नव्या मोसमात विदर्भ संघ आपली विजयी दौड अशीच कायम राखतो का हे बघायचे.