ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च, २०२५ रोजी पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार राम सुतार यांची २०२४च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.