ठाणे शहर व आसपासच्या भागात प्रदूषण वाढले की ठाणे महापालिका प्रशासन अगदी तत्परतेने एक गोष्ट करते ती म्हणजे पत्रक काढून एक नियमावली जाहीर करते. त्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आमचं काम नाही, ते प्रदूषण मंडळाने करावे असं सांगून टिकेचा चेंडू नेहमीच टोलवला जातो. आता ठाणेकरांनाही त्याची सवय झालेली आहे. बिल्डरांना बांधकाम करताना धूळ न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच धूळ जास्त झाल्यास पाण्याची फवारणी करून धूळ खाली बसवून ती वाऱ्याबरोबर वाहून जाणार नाही याची काळजी घ्या असे सांगायला मात्र पालिका विसरत नाही.
बांधकाम साहित्य उघड्यावर टाकू नका अशीही एक सूचना आहे. परंतु या सूचनेच्या पत्रकाला बिल्डरांच्या मते काडीचीही किमंत नसते हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. अगदी तलावपाळीपासून सुरुवात करूया. तालावपाळीसमोरील मार्केटच्या शेजारी मोठे बांधकाम अर्धवट सोडण्यात आलेले दिसते. तेथे कमालीची धूळ आहे. ती वाऱ्याबरोबर तालावपाळीत येणाऱ्या पर्यटकानांही खावी लागते. तेथून चालत चालत आनंदाश्रमापर्यंत आलो की शेजारीच एक नवीन बहुमजली इमारत उभारली जात असल्याचे दिसते. तेथेही बांधकामसाहित्य उघड्यावर टाकलेले दिसते. येथून आनंदाश्रमाच्या मागच्या बाजूला गेलो तर अगदी चिंचोळ्या गल्लीतही बांधकाम सुरु असल्याचे दिसते. तेथे तर कुठलाच नियम पाळला जात नाही असे नागरिकांनी सांगितले. आणि हो येथेच २४ तास पाणी साचलेले असते. शेजारीच स्पीडब्रेकर असल्याने पाणी वाहून जाण्याचा प्रश्नच नाही.

याचमागील हमरस्त्यानजिक पडलेल्या सुमारे तीन/ चार इमारती आहेत. संतापजनक बाब म्हणजे त्या भग्नावस्थेत अजूनही तशाच उभ्या आहेत. कुणाला दाखवण्यासाठी आहेत हेच कळत नाही. शिवाय हे भग्नावशेष गेली दहा-बारा वर्षे ठाणेकर का पाहताहेत याचे काही कारण डोसक्यात शिरतच नाही. बर ते बिल्डर लोकांचे निळे पत्रे व हिरवी जाळी कुठे गेली हो? येथून पुन्हा हमरस्त्यावर आलो की जैन मंदिर रस्त्यावर लियो टेलच्या समोरच्या बाजूस एक बांधकाम अगदी उघडरित्या उघड्यावर सुरु आहे. दोन पंटर कामावर नजर ठेवून असतात. येथे तर सर्व मामलाच उघड्यावर आहे. शरीर हलवायला जागा नसलेल्या याठिकाणी उघड्यावर रेती टाकलेली आहे. एक फालतू जुने मशीन रस्ता व पदपथ अडवून ठाण मांडून बसलेले आहे. वारा आला की येणारेजाणारे नागरिक तसेच आजूबाजूचे दुकानदार धूळ खातात.
समोरच सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. तेथेही बिल्डर कुठल्याच नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक तेथे तर बोअरचे पाणी उपलब्ध असूनही धुळीवर मारले जात नाही. खरंतर संपूर्ण ठाणे शहरात व विस्तारित ठाणे व लगतच्या ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने नगरविकास खात्याने पुढाकार घेऊन कामचुकार बिल्डरांवर चाबूक उगारण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे.