पुण्यात गोदरेज प्रॉपर्टीजसाठी भारतातील पहिला 3D-प्रिंटेड व्हिला बांधला गेला आहे. आयआयटी, मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा 3-डी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे चार महिन्यांच्या कालावधीत हा जी+1 असा 2,200 चौरस फुटांचा बंगला पूर्णपणे जागेवरच बांधण्यात आला आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजच्या भागीदारीत तयार करण्यात आलेला हा क्रांतिकारी प्रकल्प किफायतशीर, शाश्वत आणि कार्यक्षम बांधकाम पद्धतींमध्ये क्रांतिकारक प्रगतीचे प्रतीक ठरणार आहे. 2016मध्ये आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी चेन्नईत ट्वास्टा हा स्टार्टअप स्थापन केला. या स्टार्टअपकडून जलद, पर्यावरणपूरक बांधकामतंत्र प्रदान करण्यासाठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर केला जातो. ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर करून ट्वास्टा स्टार्टअपने तयार केलेला काँक्रिट 3-डी प्रिंटिंग प्लॅटफॉर्मद्वारे जलद, स्वस्त आणि अधिक पर्यावरणपूरक मार्गांनी पायाभूत सुविधा तसेच उत्पादित घटकांचे बांधकाम सुलभ होत आहे.
कन्स्ट्रक्शन 3-डी प्रिंटिंग हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे विशिष्ट कच्च्या मालासह 3-डी प्रिंटर एकत्र करून बांधकाम प्रक्रिया स्वयंचलित करते. या पद्धतीमध्ये थर-दर-थर पूर्णस्तरीय संरचनांचे बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामुळे पारंपरिक बांधकामपद्धतींपेक्षा प्रकल्प पूर्ण होण्यास खूपच कमी वेळ लागतो.
अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंगमधील ट्वास्टाच्या अनुभवामुळे, 3-D प्रिंटिंगला मुख्य प्रवाहातील बांधकामात इंटिग्रेड करण्यात तसेच या तंत्रात अग्रणी होण्यास मदत झाली आहे. पारंपरिक फॉर्मवर्कची गरज दूर करून आणि बांधकामप्रक्रिया सुलभ करून, 3-D प्रिंटिंग काही प्रमाणात स्वातंत्र्य प्रदान करते, जे अधिक नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम डिझाइन करण्यास सक्षम ठरते. ट्वास्टा स्टार्टअप बांधकाम आणि इतर क्षेत्रातील कचऱ्याचा पुनर्वापरदेखील करते. ट्वास्टाच्या मते, 3-डी-प्रिंटेड भिंतींमध्ये अशी रचना आहे, जी सुधारित इन्सुलेशन प्रदान करते, कमी ऊर्जा वापरते आणि उपयुक्तता खर्च कमी करते.
ट्वास्टा आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांच्या सहकार्याने पुण्यात बांधला गेलेला हा देशातील पहिला 3-डी प्रिंटेड G+1 व्हिला गृहनिर्माण क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा देणारा आहे. यातून नवोपक्रमाचे महत्त्वच नाही तर बांधकामात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या वाढत्या ट्रेंडवरदेखील यापुढे भर दिला जाईल. अत्याधुनिक 3-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला हा बंगला पारंपरिक बांधकामपद्धतींना आकार देण्याची क्षमता प्रदर्शित करतो. या प्रकल्पात वापरल्या गेलेल्या 3-डी प्रिंटिंग प्रक्रियेमुळे कचरा आणि पर्यावरणावरील परिणाम कमी तर होतीलच, शिवाय अचूकता आणि गुंतागुंतीचे तपशील तयार करणेही शक्य होईल. यामुळे बांधकाम क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या वाढत्या टंचाईवरही मात करणे शक्य होणार आहे.
आधुनिक शैली, पर्यावरणपूरक बांधकामसाहित्य आणि कमी कार्बन फूटप्रिंटसह, हा बंगला भारतात निवासी बांधकामासाठी एक नवीन मानक स्थापित करतो. बांधकाम उद्योगातील काही सर्वात महत्त्वाच्या समस्या, जसे की उच्च साहित्यखर्च, संसाधनांची अकार्यक्षमता आणि सामान्यतः रिअल इस्टेट विकासाशी संबंधित लांबलचक बांधकाम वेळापत्रक, यावर उपाय म्हणून हे तंत्रज्ञान वापरले जाते. शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या मागणीला प्रतिसाद देत भारत विकसित होत असताना, 3-डी प्रिंटेड व्हिलासारखे प्रकल्प बांधकामक्षेत्राच्या भविष्याची झलक देतात, जे गृहनिर्माण उद्योगासाठी चांगले, अधिक शाश्वत उपायही प्रदान करतात.
नमुनेदार भिंती आणि जटिल वास्तुशिल्पीय आकार यासारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांद्वारे, ट्वास्टाने पारंपरिक इमारतीच्या डिझाइनच्या सीमा ओलांडल्या आहेत. आम्ही या तंत्रज्ञानाला आणखी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत. बांधकाम क्षेत्रात ऑपरेशन्स वाढवण्याच्या आणि अशाप्रकारच्या सहयोगी भागीदारी विकसित करण्याच्याही आमच्या योजना आहेत, असे ट्वास्टाचे सहसंस्थापक आणि सीओओ परिवर्तन रेड्डी यांनी सांगितले.