मुंबईतल्या श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकाविले. मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत ध्रुव भालेरावने आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेचे आव्हान १७-१ असे संपुष्टात आणले. आक्रमक खेळ करून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या नील म्हात्रेला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त शिवाजी पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर परिसरात झालेल्या मोफत शालेय कॅरम स्पर्धेत सीईएस मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखिल भोसले व शेठ करमशी कानजी स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी उपांत्य उपविजेता; पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा पुष्कर गोळे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या वेदांत पाटणकर व सारा देवन, व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा सोहम जाधव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या केतकी मुंडल्ये व निधी सावंत, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, युनिव्हर्सल स्कूल-ठाणेचा शेवांश नाके यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद स्ट्रायकरसह आकर्षक चषक मिळवून जिंकला.
समितीचे विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. संयोजकांतर्फे सहभागी खेळाडूंना मोफत टी शर्ट व अल्पोपहार देण्यात आला. प्रमुख पंचाचे कामकाज कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, संतोष जाधव, ओमकार चव्हाण आदींनी पाहिले. समितीचे कार्यवाह डॉ. अरुण भुरे, विश्वस्त किरण पाटकर व अविनाश नाईक यांनी शालेय खेळाडूंचे विशेष कौतुक केले.