को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पुरुष एकेरीत सिटी बँकेच्या शिशिर खडपेने तर महिला एकेरीत अपना बँकेच्या गौरी कोरगावकरने, पुरुष दुहेरीत एनकेजीएसबी बँकेच्या प्रथमेश पवार-अतुल काकिर्डे जोडीने आणि महिला दुहेरीत म्युनिसिपल बँकेच्या उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने पटकाविले.
पहिल्या सेटमध्ये १-० आघाडीसह वर्चस्व राखणाऱ्या गीतेश कोरगावकरला पुढील दोन सेटमध्ये अचूक फटकेबाज खेळ करीत शिशिर खडपेने ५-१२, २५-०, १७-१५ असे चकविले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. दादर-पश्चिम येथील सीबीईयु सभागृहात अपना बँकेची गौरी कोरगावकर विरुध्द म्युनिसिपल बँकेची उषा कांबळे यामधील महिलांचा अंतिम सामना तिसऱ्या सेटपर्यंत रंगला. द्वितीय मानांकित उषा कांबळेने पहिला सेट १५-१० असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. उपांत्य फेरीत गतविजेत्या संध्या बापेरकरला २-० असे हरविल्यामुळे हौसला बुलंद झालेल्या गौरी कोरगावकरने दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये जोरदार विजयी पुनरागमन केले. अखेर गौरीने १०-१५, १२-६, २२-७ अशी बाजी मारून अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिला गटात उषा कांबळे उपविजेती, संध्या बापेरकर व सुप्रिया बने उपांत्य उपविजेते तर सुजाता सोनावणे, वर्षा भगत, साक्षी सरफरे, सुषमा केदार उपांत्यपूर्व उपविजेते ठरले. महिला दुहेरीचे अजिंक्यपद जिंकताना उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने गौरी कोरगावकर-साक्षी सरफरे जोडीचा १०-१२, २०-०, १९-११ असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.
पुरुष दुहेरीत प्रथमेश पवार-अतुल काकिर्डे जोडीने सोहेल मुकादम-मोबीन शेख जोडीचे आव्हान १२-०, १२-६ असे सहज संपुष्टात आणून विजेतेपद हासील केले. प्रशांत पुळेकर-गणेश सातर्डेकर व दानिश काझी-मिलिंद कीर जोडीने उपांत्य उपविजेतेपद पटकाविले. पुरुष एकेरीत सचिन तावडे व प्रियेश पाठक यांना उपांत्य उपविजेते तर प्रफुल जाधव, अतुल काकिर्डे, सोहेल मुकादम, भार्गव धारगळकर यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे तसेच इतर पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी पदाधिकारी कार्यरत होते.