नव्या सरकारमधील विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ९७ मिनिटे तडाखेबंद फटकेबाजी केली आणि विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह उद्धवस्त करण्यासाठी मी उभा आहे, असे सांगत ईव्हीएमवरील आक्षेपांचा समाचार त्यांनी सोदाहरण घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कार्यकाळातील गृह विभागाने शहरी नक्षली ठरवलेल्या संघटना होत्या, हे पुराव्यासह मांडून फडणवीस यांनी विरोधकांना चिडीचूप केले. शरद पवार यांच्या ईव्हीएमवरील आक्षेपांचे आश्चर्य वाटले कारण ते देशातील एक संतुलित नेते आहेत, हे सांगतानाच भारतविरोधी शक्तींना त्यांच्या बंदुका रोखण्यासाठी तुमचे खांदे वापरू देऊ नका, अशा प्रकारचे आवाहनही फडणवीस यांनी केले. ते करताना अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकारे और पार्टींया आयेगी जायेगी, लेकिन ये देश सुरक्षित रहना चाहिये, या गाजलेल्या ओळींचा आधार त्यांनी घेतला.
आंधीयोंमें भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पूछना, मेरा पता मिल जायेगा…
राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या भाषणांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्व आक्षेपांना सडेतोड आणि वकिली पद्धतीने उत्तर दिले. महाराष्ट्रात २०१९च्या निवडणुकीनंतर निर्माण केल्या गेलेल्या राजकीय कटू वातावरणात त्यांच्यावर वैयक्तिक तसेच कुटुंबावरही केल्या गेलेल्या अश्लाघ्य टीकेचा उल्लेखही त्यांनी केला. एकाच दिवसात वेगवेगळे पाच-पाच लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पाच-पाच तास टीका करत होते. पण त्यांच्या या टीकेमुळेच माझ्याबद्दल राज्यातील जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधताच, सत्ताधारी बाकांवरील सर्व आमदारांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दिलेल्या एक है तो सेफ है, या नाऱ्यासह इतर अनेक घटक आणि टीका करणारे विरोधक यांचे निवडणुकीतील यशाबद्दल आभार मानताना निवडणुकीतला हा अभूतपूर्व विजय राज्यातील जनतेचा आहे, हेही फडणवीस यांनी नमूद केले. मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि मला चक्रव्यूह भेदता येतो, हे सांगून ते म्हणाले की, मी आज ज्या जागेवर (मुख्यमंत्रीपदावर) आहे ते श्रेय माझ्या पक्षाचे, सर्व सहकारी मित्रपक्षांचे आणि जनतेचे श्रेय आहे. त्यांनी सांगितले की, मी इतकेच म्हणेन की आंधीयोंमें भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पूछना, मेरा पता मिल जायेगा…
लाडकी बहीणसाठी नवे निकष लावणार नाही
लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतेही नवे निकष लावले जाणार नाहीत, हे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले की, हे अधिवेशन संपताच डिसेंबरचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होईल. कोणतेही नवे निकष लावले जाणार नाहीत. पण काहींनी चार-चार खाती उघडली आहेत. जनतेचा पैसा आहे तो योग्यप्रकारे गेला पाहिजे. एका पुरुषाने नऊ खाती काढली तर त्याला लाडकी बहीण कसे म्हणणार… त्याला लाडका भाऊ तरी कसे म्हणणार, अशी विचारणाही फडणवीस यांनी केली.
धूल चेहरे पे और आईना साफ करता रहा…
नाना पटोले यांच्या अतिरिक्त ७४ लाख मतांवरील आक्षेपाला सविस्तर आकडेवारीनिशी उत्तर देऊन फडणवीस यांनी दर मिनिटाला, दर तासाला राज्यभर झालेल्या मतदानाच्या आकड्यांचा आढावा घेतला. तसेच, ही आकडेवारी देताना विरोधक त्यांना हे सर्व माहीत असूनही दिशाभूल करत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, पण विरोधकांनी जनतेचा आदेश स्वीकारला नाही तर त्यांची अशीच स्थिती राहील. हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी गालिबच्या ओळी उद्धृत केल्या आणि ते म्हणाले की, गालिब ता उम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा… तुम्ही जनादेश स्वीकारत नाही तोवर तुम्हीही चेहऱ्याऐवजी आरसाच पुसत राहाल, असेही त्यांनी विरोधकांना ऐकवले.
शरद पवार साहेबांचं आपल्याला आश्चर्य वाटले कारण तो देशातला संतुलित नेता आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा पवारसाहेब यांनी एक तर्क आणला की छोटी राज्यं आम्ही जिंकतो आणि मोठी राज्ये भाजपा जिंकतोय. मी त्यांना सांगू इच्छितो की कर्नाटक आणि पश्चिम बंगाल काही छोटी राज्ये नाहीत आणि आता तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणालेत की ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या आणि तेच ममता दीदींनीही सांगितले आहे.
संविधानानं निर्माण केलेल्या संस्थांविरुद्ध जनमत तयार करणं हा राजद्रोह आहे, हे सांगून अनेक उमेदवारांना यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही एकसमान मते मिळाली होती, हे फडणवीस यांनी सोदाहरण स्पष्ट केले. देशात सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाला तेव्हा २००४मध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर आले आणि तीच गोष्ट २००९ मध्येही घडली, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. तसेच, २०१४ला किंवा २०१९ला आणि २०२४ला मोदी सरकार निवडून आले की ईव्हीएममधे दोष हा आरोप कसा होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केसा. विरोधकांना पराभव पचत नसल्याने ते सर्वच लोकशाही संस्थांवर आक्षेप घेऊ लागले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जितेन्द्र आव्हाड यांचा नामोल्लेख करून फडणवीस म्हणाले की, आव्हाडसाहेबांनी ईव्हीएम हटाव रॅलीत भाग घेतला. त्याबद्दल तक्रार नाही. पण त्यातील प्रमुख वक्ते कोण होते तर अॅड. मेहमूद प्राचा, जो २०१०च्या जर्मन बेकरी केसमधील, तसेच इस्रायल बेकरी हल्ल्यातील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींचा वकील होता. तसेच इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तुम्ही निवडणुका हरल्यावर ईव्हीएमवरच दोष देणार. पण ते म्हणताना किमान त्यासाठीचे वकील तरी देशभक्त आणा.
मालेगावमधे झालेल्या पोलीस तक्रारीनंतर काही लोकांच्या खात्यांत २१ राज्यांतून सहाशे कोटी रुपये जमा झाले आणि १०० कोटी रुपये आताच्या निवडणुकांमध्ये वापरले गेले, हे लक्षात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांच्या देशभक्तीवर शंका नाही, असे स्पष्ट करतानाच तुमचा खांदा कुणालाही बंदुका ठेवायला वापरायला देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातल्या सरकारविरुद्ध तसेच ईव्हीएमविरुद्ध लोकांमध्ये वातावरण करण्याचे ठराव काठमांडूमध्ये अर्बन नक्षल गणल्या गेलेल्या संघटनांच्या बैठकांमध्ये केला जातो, याकडे लक्ष वेधून फडणवीस यांनी अशा काही संघटनांचा सहभाग भारत जोडो या राहूल गांधींच्या अभियानात होता, हेही अधोरेखित केले.
छत्रपती शिवरायांनी मराठीला पहिल्यांदा राजभाषेचा दर्जा दिला होता. संविधानाच्या निर्मितीनंतर तो मोदीसाहेबांनी दिला. भाषा भवन उभारणे, ग्रंथ साहित्य प्रसारासाठी प्रतिवर्षी निधी मिळेल आणि विद्वानांना दरवर्षी दोन पुरस्कार केंद्राकडून मिळतील, असे सांगून ते म्हणाले की, देशभरात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारली जातानाच ४५० विद्यापीठात मराठी शिकवण्याची व्यवस्था होईल आणि सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद होऊ शकणार आहे. त्याद्वारे आपली अभिजात भाषा नव्या स्वरूपात रुजवू शकणार आहोत.
उद्योग गुजरातला हाही फेक नँरेटिव्हच
उद्योग गुजरातला हा प्रचार विरोधकच जोरात करतात, पण काही काळजी करू नका कारण महाराष्ट्र काल, आज उद्याही नंबर वनच राहणार, असे सांगून फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकणार नाही. देशात आज दहा राज्ये स्पर्धा करत आहेत. त्याकरीता आपण आनंदित व्हायला हवे. सर्वांना मागे टाकत महाराष्ट्र पुढे राहयला हवा आणि त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह फेडरॅलिझम याचा आनंद वाटायला हवा, असेही ते म्हणाले. उद्योगविषयक सविस्तर आकडेवारीही त्यांनी सादर केली. गुंतवणूकदारांना खंडणीसारखे त्रास झाले तर गुंतवणूक येणार नाही. माझ्या पक्षासह सर्व पक्षांना विनंती आहे की हे सर्व वसुलीबाज कोणाचा ना कोणाचा आसरा घेतात, हे लक्षात घेऊन त्यांना आसरा नाही दिला तर दुपटीने गुंतवणूक होईल.
सुधारित प्रशासकीय मान्यतेद्वारे १६७ प्रकल्पांमधून २१ लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, हे सांगून ते म्हणाले की, नदीजोड, जलयुक्त शिवार तसेच जलसंधारण हे तीनही आवश्यक आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक ६७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात पैसे दिले गेले आहेत. पायाभूत सुविधांचा आढावा घेताना मुंबई मेट्रो ३ प्रकल्प मे २०२५पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी जाहीर केले. राज्यातील शेतकऱ्यांना सोलर फीडर योजनेतून एसएसईबी सोलर एग्रो पॉवर लिमिटेड ही फक्त शेतकऱ्यांसाठी १६ हजार मेगावॅट प्रकल्प होत आहे, हे सांगून ते म्हणाले की, हा राज्यातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर उर्जा प्रकल्प असून २०२६पर्यंत पूर्ण १६ हजार मेगावँटची कामे पूर्ण करायची आहेत. त्याद्वारे विजेपोटी द्यावी लागणारी सबसिडीची रक्कम वाचणार असून १५ हजार कोटीची बचत होणार आहे. सध्या ९ लाख सौर कृषीपंप आपल्याकडे आहेत आणि आता आपण मागेल त्याला सौरपंप तीन महिन्यात देत आहोत. राज्यात निर्माण होणाऱ्या विजेपैकी ५२ टक्के वीज २०३०पर्यंत ऊर्जा सौरची असेल.
किनारपट्टीवरील ७०० लँण्डिंग पॉइंट्स लक्षात घेऊन तेथे मानवी गस्त कशी निर्माण करता येईल, याचा आराखडा केलेला आहे, असे त्यांनी सांगितले. जलवाहतुकीचा आढावा घेताना ते म्हणाले की, देशाच्या जलवाहतुकीतून होणाऱ्या वाहतुकीतील ६५ टक्के रवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट करते. त्याच्या तिप्पट क्षमता वाढवण बंदराची असणार आहे आणि तेथे जगातले सर्वत मोठे मालवाहतूक जहाजही येऊ शकणार आहे. या बंदराबरोबरच मुंबईचा तिसरा विमानतळ पालघर भागात होणार असून त्यासाठी पंतप्रधानांनी मंजुरी दिलेली आहे. हा विमानतळ समुद्रात रिक्लेमेशन करून होणार असून तो जगातला मोठा विमानतळ होईल, असेही त्यांनी सांगितले.