मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबचा 34 -32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात कबड्डीप्रेमींना ठराविक सामन्यांचा मनमुराद आनंद लुटता आला. महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाला जेतेपद पटकावताना डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबशी कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला शिवशक्तीकडे 20-16 अशी चार गुणांची आघाडी होती. दुसऱ्या सत्रात शिरोडकरच्या चढाईपटूंनी जोरदार संघर्ष करत शिवशक्तीशी बरोबरी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र ते थोडक्यात अपयशी ठरले आणि शिवशक्तीने 35-30 असा विजय मिळवत आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखली. शिरोडकरच्या मेघा कदमला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा तर शिवशक्तीच्या पौर्णिमा झेंडे आणि प्रतीक्षा तांडेल यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पकडपटू आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
व्यावसायिक गटात स्वामी समर्थ आणि रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लब यांच्यातला अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. या लढतीत रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मध्यंतराला 13-11 अशी दोन गुणांची आघाडी आपल्याकडे राखली होती. मात्र दुसऱ्या सत्रात स्वामी समर्थच्या चढाईबहाद्दरांनी वेगवान खेळ करत आधी बरोबरी साधली आणि नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राखत जेतेपदही पटकावले. त्यांनी हा संघर्ष 34-32 असा जिंकला. स्वामी समर्थचा यश चोरगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडविराचा मान दीपक सांगळे आणि रुपेश साळुंखे यांनी मिळवला.
पुरुषांच्या स्थानिक गटात मात्र विजय क्लब आणि जय भारत क्रीडा संघात झालेला अंतिम सामना अत्यंत एकतर्फी झाला. विजय क्लबच्या खेळाडूंनी प्रारंभीच पल्लेदार चढाई करत 17-5 अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले. दुसऱ्या सत्रातही जय भारतच्या खेळाडूंचे काहीही चालू शकले नाही. परिणामतः विजय क्लबने ही लढाई 27-13 अशी सहज जिंकली. विजय क्लबचा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. जयवादाचा दीपेश पाटील आणि एस एस जीचा ओमकार थोटे सर्वोत्कृष्ट चढाई आणि पकडवीर ठरला.
स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, आमदार महेश सावंत, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनिल बोरकर
यांच्या उपस्थितीत पार पडला.