हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी छायाचित्रांच्या पुराव्यासह कुतुब मिनारचा खरा इतिहास सांगितला आहे. त्यांनीच लिहिलेल्या या पुस्तकामागची भूमिका खास आपल्या वाचकांकरीता..
जवळजवळ तेरा-साडेतेरा वर्षांपूर्वी, २०१० साली मी कुतुब मिनार पहिल्यांदा पाहिला. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत मी तो सर्व परिसर फिरत होतो. निरखत, न्याहाळत होतो. तेव्हा काढलेली छायाचित्रे वापरून माझी निरीक्षणे नोंदवणारा एक बऱ्यापैकी विस्तृत लेख मी त्याचवेळी मुंबईच्या दै. ‘नवाकाळ’साठी लिहिला. वास्तविक, असे म्हणावे लागेल की त्या काळात तो लेख प्रसिद्ध करण्याची हिंमत ‘नवाकाळ’च्या संपादकांनी दाखवली. लेख प्रसिद्ध करताना दै. ‘नवाकाळ’च्या संपादकांनी किंवा मीसुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती इतका प्रतिसाद त्या लेखाला मिळाला. अनेक वाचकांनी उलटसुलट मते नोंदवली. मी विनाकारण नवा वाद उकरून काढण्याच्या मागे आहे, असा आरोपही काही जणांनी केला. पण, मी प्रसिद्ध केलेली छायाचित्रे अधिक प्रभावी ठरली. मी त्या विषयावर सविस्तर लेखन करून पुस्तक लिहावे असेही अनेकांनी सुचवले. माझ्याही मनात तो विचार होता. पण नंतरच्या काळात विविध कारणांनी ते काम मागे पडत गेले. तरीही कुतुब मिनारवर जमेल तसे वाचन करणे, सहजासहजी हाताला लागलेले संदर्भ जमवून ठेवणे, हे काम करतच होतो. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा त्या विषयाकडे वळण्याइतका वेळ मिळाला. त्यातून एक लहानसे पुस्तक मी तयार केले. ते पुस्तक करताना Coffee table book ही संकल्पना मी वापरली होती. अधिकाधिक छायाचित्रे आणि त्या छायाचित्रांना जोडणारा प्रवाही मजकूर अशा तंत्राने तयार केलेले ते पुस्तक २०१६ साली प्रसिद्ध झाले. ती आवृत्ती वर्षभरातच संपली. पण त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करणे किंवा नवी आवृत्ती काढणे ह्या दोन्ही बाबतीत माझ्या स्वभावाप्रमाणे आळस केला गेला.
या मधल्या काळात देशातले वातावरण मोठ्या प्रमाणावर बदलले होते. २०१० साली मी कुतुब मिनारवर लिहिले तेव्हा अशा विषयांना मिळणारा प्रतिसाद वेगळा होता. त्यावेळेला माझ्यावर भरपूर टीका झाली. मी कुरापतखोर असल्याचा आरोप झाला. समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करून देशात जातीय विद्वेषाचे राजकारण करण्याचा रा.स्व. संघ परिवाराचा Agenda मी राबवतोय असेही म्हटले गेले. पण, हे सर्व म्हणणाऱ्यांपैकी कोणीही, कुतुब मिनारसंबंधी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नव्हती किंवा मी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांबद्दल काही भाष्य केले नव्हते. मी उपस्थित केलेले प्रश्न कुतुब मिनार या वास्तू व परिसराच्या संदर्भात होते. हे खरे असले तरी ते केवळ कुतुब मिनारपुरते मर्यादित नव्हते. गेल्या दोनशे वर्षांमध्ये भारतीय इतिहासाची जी मांडणी केली गेली तिच्याशी जोडलेले ते प्रश्न होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरू व काँग्रेसने ज्यांना राजाश्रय देऊन, त्यांच्यावर अमाप पैसा उधळून इतिहासलेखन करून घेतले त्या डाव्या इतिहास लेखकांनी रंगवलेल्या खोट्या इतिहासाबद्दलचे ते प्रश्न होते. कुतुब मिनारबद्दल विचारला जाऊ शकणारा प्रत्येक प्रश्न प्रातिनिधिक असून तो भारतातील प्रस्थापित संपूर्ण इतिहासलेखनाला लागू पडू शकतो. त्यामुळे त्या प्रश्नांची चर्चा झालीच पाहिजे. सन २०१४नंतरच्या काळात बदललेल्या वातावरणात कुतुब मिनारबद्दल मी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत असे म्हणणारा एक मोठा वर्ग उदयाला आला. ह्या नव्याने उदयाला आलेल्या वर्गाला कुतुब मिनारच नाही तर ताजमहाल, मथुरा, काशी विश्वनाथ अशा सर्वच लहानमोठ्या ठिकाणांबद्दल उत्सुकता वाटायला लागली आहे.
मराठीमध्ये कुतुब मिनार, या विषयावर अत्यंत मर्यादित साहित्य उपलब्ध आहे. त्यातही सरकारी भूमिका बाजूला सारून, वेगळे कथन मांडणारे, अडचणीचे वाटणारे प्रश्न विचारणारे लेखन तर अभावानेच केले गेले आहे. त्यामुळे माझे पुस्तक पुन्हा एकदा आठवणीत आले व त्याची चौकशी सुरु झाली. पण तरीही त्या विषयावर माझ्या अपेक्षेनुसार मी काम केलेले नसल्यामुळे नवे काही घडले नाही. आता मात्र अनेकांच्या आग्रहामुळे मूळ पुस्तकात थोडीफार भर घालून ही दुसरी आवृत्ती सादर करत आहे. ही आवृत्ती तयार करत असताना पुस्तकाची मांडणी बदलली असली तरी मूळ सर्व छायाचित्रे कायम ठेवून काही नवी समाविष्ट केली आहेत. तसेच काही नवा मजकूरदेखील दिला आहे. एकूण पुस्तक जास्तीतजास्त प्रेक्षणीय व वाचनीय करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक मुख्यतः सर्वसामान्य वाचकांसाठी आहे. दिल्लीमध्ये पर्यटक म्हणून जाणारा वर्ग डोळ्यांसमोर ठेवून मी हे लेखन केले आहे. इतिहास संशोधक, अभ्यासक किंवा विद्वान वर्ग डोळ्यांसमोर ठेवून हे लेखन केलेले नाही. तसे लेखनही करायचा माझा इरादा आहे, पण त्यासाठी आवश्यक असलेला या विषयाचा सखोल अभ्यास मी अद्याप केलेला नाही. त्यामुळे चौकस नजरेने कुतुब मिनार परिसर पाहत असताना बुद्धीला स्वाभाविकपणे पडणारे प्रश्न मी याठिकाणी विचारले आहेत. प्रस्थापित विद्वान इतिहास संशोधक, अभ्यासक वर्गाने माझ्यासारख्यांना पडणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. ती उत्तरे मागण्यासाठी माझे लेखन आहे. एका अर्थाने देशातील नवजागृत वर्गाचा प्रतिनिधी या नात्याने मी हे प्रश्न उपस्थित करत आहे, असेही म्हणायला हरकत नाही. भारताच्या आजवरच्या इतिहासलेखनाशी संबंधित असे हे सर्व प्रश्न आहेत. त्या सर्वच प्रश्नांची खुली चर्चा झाली पाहिजे, ती घडवून आणली पाहिजे. ह्या विषयावर लेखन करण्यामागील माझी भूमिका ही आहे.
आणीबाणीच्या काळातील बंडखोर कवी दुष्यंत कुमारच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचे तर ‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही, सारी कोशिश हैं की ये सुरत बदलनी हैं’
इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार
लेखक: माधव भांडारी
प्रकाशक: विराट प्रकाशन
पृष्ठे- ७६ / मूल्य-१९९ ₹
टपालखर्च- ३० रु.
ग्रंथ संवाद वितरण- 8383888148