दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये उभारलेला एन.डी.स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (गोरेगाव फिल्मसिटी) परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. या एन.डी. स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
या पाहणी दौऱ्याकरीता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उपसचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाने (NCLT) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या Resolution plan ला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी. स्टुडिओचे दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रिकरणे, महसूल वाढ, लेखाविषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. त्यामुळे हे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली.
विशेष कृती पथकाची स्थापना
प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सहव्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उपसमन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच वित्तीय, विधि, आयटी, मनुष्यबळ आदि क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचादेखील समावेश आहे. सध्यस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत.