लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं गाणं.. त्यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य आठवणी.. आईच्या मायेने त्यांनी केलेला आग्रह, त्यांचं आगत्य, त्यांचा ‘परफेक्शन’चा अट्टहास.. हे सगळंच आज आठवतं आहे. त्यांचं हसणं.. त्यांचं नकला करणं, त्यांची अतिशय ठाम जीवनमूल्यं, प्रखर स्वाभिमान आणि तितकाच प्रखर राष्ट्राभिमान हे सगळंच तर सततच मनात आठवणींच्या रूपात पिंगा घालत असतं. त्यांचं सुराप्रती असलेलं समर्पण, सुरांवर असलेली श्रद्धा ही तर पूजा करण्यासारखी होती. अनुकरणीय होती.
एक किस्सा सांगायचा तर, त्यांना काळा रंग खूप आवडायचा. मात्र ज्यांना त्या ‘पप्पा’ म्हणायच्या.. वडिलांच्या जागी मानायच्या त्या, प्रख्यात गीतकार-कवी आणि ज्योतिषाचं गाढ ज्ञान असलेल्या पंडित नरेंद्र शर्मा यांनी त्यांना ‘तू काळा रंग वापरू नकोस’ असं सांगितलं होतं. मात्र एकदा त्यांना एक काळी साडी भेट मिळाली आणि ती त्यांना खूप आवडली. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात त्यांना फक्त एक श्लोक म्हणायचा होता. त्यांनी त्या कार्यक्रमासाठी ती साडी नेसायची ठरवलं. ही साडी नेसूनच त्या मंचावर गेल्या आणि त्यांनी तो श्लोक म्हटला.
पण आपला श्लोक बेसूर झाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. दुःखी झाल्या. विंगेत येऊन त्या अक्षरशः डोकं धरून बसल्या. पंडित हृदयनाथजी तिथे होते. काय गडबड झाली आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. पण प्रेक्षकांपैकी कोणाच्याही ते लक्षातसुद्धा आलं नव्हतं. त्यामुळे ते त्यांना असं म्हणाले की जाऊ दे, कोणाच्याही काही लक्षात आलेलं नाही. तू फार काही वाटून घेऊ नकोस.
मात्र त्या म्हणाल्या की, कोणाच्या लक्षात येऊ दे नाहीतर नको येऊ दे, पण माझ्या लक्षात आलंय ना, की मी बेसूर झाले. मी सुरांशी प्रतारणा केली..
आपण काळी साडी नेसलो म्हणूनच असं झालं, असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यानंतर त्यांनी कधीच काळी साडी नेसली नाही!
सुरांवरची अशी निष्ठा, असं समर्पण होतं म्हणूनच त्या स्वरसम्राज्ञी बनल्या. भारतरत्न बनल्या!
त्यांचं कृतज्ञ स्मरण आणि त्यांना नमन l