Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसलालबागचा राजा टेन्शनमध्ये!

लालबागचा राजा टेन्शनमध्ये!

मुंबईतला लालबागचा राजा सध्या टेन्शनमध्ये आहे. पावू कुणाला, या प्रश्नाने त्याला ग्रासले आहे. सर्वसामान्यांच्या डोक्यावर आपला आशिर्वादाचा हात ठेवायचा की त्या सामान्य जनतेचे भले करण्याच्या आणाभाका घेणाऱ्या राजकीय नेत्यांकडे पाहायचे? आणि या नेत्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे भले करायचे तर नेमक्या कोणत्या नेत्याला तारायचे? रोज नवनवीन चेहरे समोर येत आहेत. दोन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत, हे मी समजू शकतो. पण म्हणून मला बुचकळ्यात का टाकतात हे राजकारणी? असे एक नाही अनेक प्रश्नांनी राजाला भंडावून सोडले आहे.

लालबाग

उत्सवाला सुरूवात झाली नाही तोच सुपरस्टार अमिताभ बच्चन दर्शनासाठी पोहोचले. सध्या अमिताभ एक वयोवृद्ध सुपरस्टार आहेत. कधी एकेकाळी त्यांना सत्तेच्या खुर्चीचा मोह झाला होता. १९८४मध्ये तेव्हाचे काँग्रेसचे नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आग्रहानंतर अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. त्यात त्यांनी प्रसिद्ध नेते व राजकारणातले नटवरलाल म्हणून ओळखले जाणारे हेमवतीनंदन बहुगुणा यांचा लाखाहून जास्त मतांनी पराभव केला होता. परंतु नंतर त्यांना राजकारण हा आपला प्रांत नसल्याची उपरती झाली आणि त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा चित्रसृष्टी गाठली. तेव्हापासून आजपर्यंत ते पुन्हा राजकारणाच्या भानगडीत पडले नाहीत, हे बाप्पाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे राजाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

करोडपती

पण, नंतर सकाळी सकाळीच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह राजासमोर उभे ठाकले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या हयातीत कधी आपल्या दर्शनाला आले होते हे आठवत नाही. परंतु लालबाग मार्केटमधल्या एखाद्या आपल्या भक्ताला याची माहिती असल्यास त्याने नमस्कार घालताघालता सांगितले तरी चालेल, अशी भावना कदाचित राजाच्या मनात निर्माण झाली असावी. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः २०१४ला सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह नियमितपणे लालबागच्या राजापुढे नतमस्तक होत आहेत. हल्ली तर ते माजी मुख्यमंत्री आणि आमदार या दोन विशेष बिरूदांसह हजर असतात. सोबत त्यांच्याच मंत्रिमंडळातले माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेही होते. तसे पाहिले तर काँग्रेसबरोबर गेलेले ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात कुख्यात दहशतवादी याकूब मेमन याच्या मुंबईतल्या कबरीचे सुशोभिकरण झाले होते. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या एकूण भूमिकेमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मुसलमानांचीच मते जास्त पडली. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण हिंदुत्व कसे टिकवून आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे राजाही जाणतो.

लालबाग

पण, लालबागचा राजा खरा हैराण झाला ते शरद पवार यांना समोर पाहून.. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष. अजितदादांनी पक्षात फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसवरच कब्जा केल्यानंतर पेटून उठलेले पवार आता दर्शनालाही जाऊ लागले आहेत. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे शरद पवार आता हिंदुत्वाच्या बाजूने झुकताहेत की काय, असा प्रश्न पडावा अशा घटनांचे साक्षीदार होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावाने कधीही जयजयकार न करता आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी शाहू, फुले, आंबेडकर यांना अभिवादन करून करणारे शरद पवार आपण नेहमी पाहतो. धर्मनिरपेक्षतेचा पुकारा करताना आपण रूढी, परंपरा, सणवार याला सार्वजनिक जीवनात फारसे महत्त्व देत नाही, अशी पवारांची भूमिका कायम राहिलेली आहे.

लालबाग

मात्र पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी थेट रायगड गाठले. तुतारी चिन्हाचे अनावरण त्यांनी रायगडाला साक्षीला ठेवत केले. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी बारामतीतल्या काटेवाडीतल्या कन्हेरी हनुमान मंदिरात नतमस्तक होऊन केली. सकाळी सकाळी त्यांनी चक्क लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. या गणपतीच्या दर्शनासाठी पवार आपले जावई सदानंद सुळे तसेच नात रेवती सुळे यांच्यासोबत धडकले. दर्शन घेऊन, छानसे फोटोशूट करून पवार तेथून निघाले. येथे त्यांनी कोणता नवस केला ते बाप्पाच जाणो. मात्र, समाजमाध्यमांवर मात्र पवारांनी बळीराजा तसेच जनसामान्यांच्या प्रश्नावर लढण्याचे बळ मिळो असे आर्जव गणरायासमोर केल्याचे जाहीर केले. हे पाहून लालबागचा राजाही गालातल्या गालात हसला.

त्यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे हेवीवेट नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सपत्निक राजाच्या दर्शनाकरीता हजर झाले. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसही त्यांच्याबरोबर होते. २०१४ सालची विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून नित्यनेमाने ते राजाच्या दर्शनाला मुंबईत येतात. दोन दिवसांचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. आले की पक्षाच्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा आणि गणेशदर्शन, असा त्यांचा कार्यक्रम असतो. योगायोगाने या काळात मधली दोन वर्षे सोडली तर त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे या खेपेला त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बसविलेल्या गणरायासमोर नतमस्तक झाले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घराजवळच्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही त्यांनी भेट दिली. मात्र, त्यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात विमानतळावर झालेल्या बैठकीव्यतिरिक्त इतर कोठेही दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिसले नाहीत. त्यामुळे राजालाही प्रश्न पडला की, महायुतीत सारे काही आलबेल आहे ना?

लालबाग

दुसरा दिवस उजाडला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे समोर हजर. त्यांच्या एका बाजूला पत्नी शर्मिला तर दुसऱ्या बाजूला मुलगा अमित व त्याचे कुटूंब. राजाला समजेना, हे काय चालले आहे? भगवा, हिरवा आणि निळा, असा तीन रंगाचा ध्वज फडकवत मनसे स्थापन करणारे राज ठाकरे यांनी अलीकडेच फक्त भगव्या रंगाचा ध्वज स्वीकारला. हिंदुत्वावर कडवी भूमिका घेण्यास सुरूवात केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांशी चर्चेच्या दोन-चार फेऱ्या केल्या. एकदा मुलाबरोबर दिल्लीवारी केली आणि निवडणूक प्रचार भरात येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तेही एकही उमेदवार न देता. मात्र निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर काही ठिकाणचे उमेदवारही घोषित केले. येत्या निवडणुकीत मनसे २००-२२५ जागा लढवेल, अशी घोषणाही त्यांनी केली. यामुळेच राजा बुचकळ्यात पडला आहे. आता २००-२२५चा नारा देणारे राज ठाकरे उद्या तडजोडीसाठी बसले तर..

लालबाग

इतके सारे नेते आले, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तसेच काँग्रेसचे कुणी नेते लालबागला का फिरकले नाहीत, म्हणून राजा चौकशी करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, अजितदादांनी आता फक्त पुण्यावरच लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. गुलाबी जाकीट घातल्यापासून ते प्रत्येक कृती तोलूनमापून करतात. मुंबईतल्याच प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी खाली बसून व्यवस्थित पूजाअर्चा केली. सध्या ते पुण्यातल्या विविध गणपतींचे दर्शन घेण्यात मग्न आहेत. पुण्यातल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या दर्शनानेच दादांनी आपल्या दर्शन मोहिमेला सुरूवात केली आहे, हे समजताच राजाचा जीव भांड्यात पडला.

लालबाग

राहता राहिला काँग्रेसच्या नेत्याचा प्रश्न. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत डॉ. फारूख अब्दुल्लांसोबत भाषणे ठोकताहेत, पक्षाचे प्रमुख नेते व लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेत भारतविरोधी व्यक्तींच्या गाठीभेटी घेत नेहमीप्रमाणे भारताची नाचक्की करत फिरत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीची मोट बांधताना आपल्या पदरात मुख्यमंत्रीपद कसे पडेल याची व्यूहरचना करण्यात मग्न आहेत. मग, अशावेळी लालबागच्या राजाकडे धावल्या त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड. परवाच त्यांनी राजाचे दर्शन घेतले आणि राज्यातल्या जनतेसाठी सुखसमृद्धीची प्रार्थना केली.

लालबाग

काँग्रेसच्याही नेत्यांनी हजेरी लावल्याने लालबागचा राजा अखेर सुखावला. मात्र, मनोमन तो हैराण आहे. या नेत्यांपैकी आशिर्वाद तरी कोणाला द्यावा हे त्याला समजत नाही. २००० साली त्याच्या दर्शनाला कोणतीही रांग नव्हती. त्यामुळे कुठच्याही बाजूने येणाऱ्या भाविकाला तो तथास्तू म्हणत होता. एका प्रथितयश मराठी दैनिकाच्या मार्केटिंग टिमने लोकांना फ्रेमसाठी फोटो द्या म्हणून पहिल्या पानावर गणपतीचा पानभर फोटो छापण्याची कल्पना मांडली. संपादकांनी फोटोग्राफरच्या टीमकडून फोटो मागवले. त्यात लालबागच्या राजाचा फोटो निवडला गेला. खाली कॅप्शन काय द्यायची म्हणून वार्ताहराने संबंधित मंडळाच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. उत्तर मिळाले की, हा गणपती नवसाला पावतो. झाली खाली कॅप्शन तयार. नवसाला पावणारा गणपती. तेव्हापासून राजा सुरक्षायंत्रणेच्या विळख्यात पडला आहे. आणि तेव्हापासून राजापुढे सेलिब्रेटी आणि नेत्यांच्या रांगा लागू लागल्या आहेत. अशा स्थितीत राजा हात तरी कोणाच्या डोक्यावर ठेवणार?

2 COMMENTS

  1. सर्वसामान्य जनतेच्या भावना राजाच्या माध्यमातून मांडलात… खुप बरे वाटले.
    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पाहा काळाचा महिमा.. फडणवीस तावडेंकडे तर, पवार लालबागच्या राजाकडे!

काळाचा महिमा बघा. शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्या घरी! तसे पाहिले तर हे दोन्ही नेते आपापल्या पक्षातले मातब्बर नेते. परंतु डोळ्यासमोर विधानसभेच्या निवडणुका आणि त्याला सामोरे जाताना कोणतीही रिस्क न घेण्याची या दोन्ही...

कामांध समाजमनाने लॉकडाऊनचा काळही सोडला नाही!

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हादरला होता. या कारणांवरून बदलापूरमध्ये अभूतपूर्व असे आंदोलन झाले होते. राज्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनआंदोलनाला पर्वणी मानत सक्रीय पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्या लाडकी...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे धाबे दणाणले?

महाराष्ट्रात सध्या विरोधातल्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीविरूद्ध तसेच घडलेल्या घटनांचा वापर करत विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मग, सरकारची लाडकी बहीण योजना असो की बदलापूरची घटना, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना... सरकारविरूद्ध आंदोलन करत, विरोधी...
error: Content is protected !!
Skip to content