भारतीय टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला दुपारी 3 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची (ज्यामध्ये महाराष्ट्रातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांचादेखील समावेश आहे) टपाल विभाग निवृत्तीवेतन अदालत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे.
टपाल विभागातून (टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक) सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्यांच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन लाभासंबंधीच्या तक्रारी तसेच ज्यांच्या निवृत्तीवेतनाच्या तक्रारी 3 महिन्यांच्या आत निकाली काढल्या गेल्या नाहीत अशा तक्रारी या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये निवारणासाठी विचारात घेतल्या जातील. या टपाल निवृत्तीवेतन अदालतीमध्ये कॅट (CAT) किंवा न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणासंबंधीच्या तक्रारी यासारख्या पूर्णपणे कायदेविषयक समस्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
या अदालतीत भाग घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी महेश एन., लेखाधिकारी आणि सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी-403001 या पत्त्यावर किंवा accts.goa@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावर आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत. 26 जुलै 2024नंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर निवृत्तीवेतन अदालतीत विचार केला जाणार नाही, असेही टपाल खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.