ते जिंकले किंवा हरले तरी काही फरक पडत नाही, पण खेळामध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे आणि खेळाडूंनी इतर संघांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात ड्युरंड चषक स्पर्धेच्या 2024च्या चषकांचे अनावरण केले. अनावरण केलेल्या करंडकांमध्ये ड्युरंड चषक, राष्ट्रपती चषक आणि शिमला चषक यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रपतींनी ड्युरंड चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
काहीवेळा खेळामध्ये भावनांचा आवेग असतो. परंतु खेळाडूंनी त्यांच्या भावनांना योग्यरित्या समायोजित करण्यासाठी आणि खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सर्व खेळाडू जिद्दीने आणि खिलाडू वृत्तीने खेळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. व्यावसायिक फुटबॉलपटू जेव्हा हजारो चाहत्यांसमोर खेळतात तेव्हा खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह कैक पटींनी वाढतो, असेही त्या म्हणाल्या. भारतातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी सर्व फुटबॉलप्रेमींनी प्रयत्न करावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.
भारतातली राष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध आणि नामांकित फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरंड चषक स्पर्धेला ओळखले जाते. १८८८ सालापासून ही स्पर्धा सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे पहिली ड्युरंड चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

