काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय पक्षातील कार्यकर्त्याने हाताने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला असून लोकसभेत अपप्रचार करून मिळालेल्या यशाची मस्ती नाना पटोले यांच्या या कृतीतून दिसून आली असल्याची टीका शिवसेना सचिव व प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.
पालखी सोहळ्यासाठी वडेगावला गेलेल्या नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुऊन घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. लोकसभेत संविधान बदलणार, मनुस्मृती आणणार असा खोटा प्रचार करून सामान्य जनतेला संभ्रमात टाकून महाविकास आघाडीने लोकसभेत यश मिळविले. परंतु आता आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहोत अशा मस्तीत राहणाऱ्या नाना पटोले यांनी जाहीरपणे संविधानाचा अपमान केला आहे. कारण संविधानाला सर्वात मोठा धोका हा व्यक्तिपूजेला असून आजमितीला काँग्रेस त्याच दिशेने जात असल्याचे या कृतीवरून स्पष्ट होते. त्यामुळे नाना पटोले यांनी आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संविधानाचा अभ्यास करण्यासाठी मोठी सुट्टी घ्यावी, अशी टीकाही त्यांनी केली.
मीच धुतले माझे पाय – नाना पटोले
दरम्यान, वृत्तवाहिन्यांवरच्या बातम्यांमध्ये पक्षकार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपणच आपले पाय धुतल्याचा दावा केला आहे. प्रसारमाध्यमामधून माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली होती. मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले होते. एका कार्यकर्त्यांने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले. यात गैर काय आहे, असे सवाल त्यांनी केला.
मी शेतकरी माणूस आहे. मला चिखलाची सवय आहे. जे काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. परंतु ज्या लोकांचे पाय ईडी कारवायात माखलेले आहेत. ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल काही तरी बोलले पाहिजे, तेही दाखवले पाहिजे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेसला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अशाप्रकारे कारस्थाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याने काहीही फरक पडणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.