Homeटॉप स्टोरीविधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे...

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे तीनतेरा?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत असून यामध्ये महायुती पुरती निकालात निघाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचा कोणीही नेता उपस्थित नसल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भवितव्य काय असेल, अशी शंका उपस्थित होत आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून एकूण ८८ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ३३ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महायुती

मुंबई पदवीधर मतदारसंघात ८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रमुख लढत शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलार यांच्यात होत आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर १३ उमेदवार असून प्रमुख लढत काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यात होत आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असून ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि शिवसेनेचे किशोर दराडे यांच्या मुख्य लढत आहे. मुंबईतील शिक्षक मतदारसंघात १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजपाचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे यांच्या प्रमुख लढत आहे.

बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीची ही स्थिती पाहिल्यास यामध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होत असल्याचे दिसून येते. अशातच आज राष्ट्रवादीकडून बारामती लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित होते. मात्र, शिवसेना किंवा भाजपाचा कोणीही नेता यावेळी नव्हता. पटेल यांना याबाबत विचारले असता त्यांनी महायुतीतल्या सहकाऱ्यांना आम्ही निमंत्रित केले नव्हते, असे सांगितले. मात्र त्यामुळे महायुतीत आलबेल नाही, अशी शंका घेण्यास वाव मिळाला.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content