पश्चिम बंगालमध्ये 2010नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओबासी कोट्यातले आरक्षण मुस्लीम समाजाला देण्याच्या त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदार चपराक बसली आहे. त्यातच न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधानविरोधी चेहरा दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल व्यक्त केली.
एका जनहित याचिकेवर निकाल देताना 2010 ते 2024 या काळात पश्चिम बंगाल सरकारने दिलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या घुसखोरांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. ममता बॅनर्जी सरकारने कोणतेही सर्वेक्षण न करता मुस्लीम समाजातल्या 118 जातींना थेट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण दिले. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नसतानाही ममता बॅनर्जी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना दिले होते. न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्दबादल ठरवला आहे.
न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसून यापुढेही याच पद्धतीने ओबीसी आरक्षणातून मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल, असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधानविरोधी चेहरा दाखवून दिला आहे. यातून तृणमूल काँग्रेस आणि इंडी आघाडी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसी,आदिवासी, दलित समाजाचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा कट भारतीय जनता पार्टी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला नव्हता. मोदी सरकारने मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देऊन ओबीसींच्या हक्काचे रक्षण केले. न्यायालयाचा अवमान, संविधानाचा अपमान आणि पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे तुष्टीकरणाचे राजकारण यापुढे जनता खपवून घेणार नाही. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तेथील जनता 30पेक्षा अधिक जागी भारतीय जनता पार्टीला विजयी करून ममता बॅनर्जींना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांना नुकत्याच एका कार्यक्रमात इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी दलित, मागास वर्गाच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले हे मान्य करावे लागले, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.