देशातल्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेसच्या प्रमुख स्टार प्रचारकांविरूद्ध परस्परांविरूद्ध करण्यात आलेल्या २५ तक्रारी आजही प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.
निवडणूक आयोगाने, पारदर्शकता आणि खुलेपणा यांच्या दृढ वचनबद्धतेनुसार, आदर्श आचारसंहिता (एमसीसी) लागू झाल्याला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या तक्रारींवर आधारित, एमसीसी अंतर्गत केलेल्या कारवाईची स्थिती अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने ही माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे भागधारक मतदार आणि राजकीय पक्षांना समतोलता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची वास्तविक वेळेत माहिती मिळेल.
सुरुवातीला, आयोगाने राजकीय पक्षांच्या, विशेषत: प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून, ज्यांपैकी बहुतेक स्टार प्रचारक आहेत, त्यांनी सध्याच्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या प्रचार भाषणांमधून चांगली उदाहरणे मांडण्याची अपेक्षा केली आहे. देशाच्या नाजूक समतोल सामाजिक जडणघडणीला कायमची ठेच लागू नये म्हणून उर्वरित टप्प्यांमध्ये त्यांची विधाने/बोल सुधारणे ही मुख्यतः त्यांची जबाबदारी आहे.

16 मार्च 2024 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेसह देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आता निवडणुकीचे चार टप्पे संपले. आचारसंहिता लागू झाल्यापासून आता दोन महिने पूर्ण झाले असताना, विविध राजकीय पक्ष आणि मतदारसंघ स्तरावरील उमेदवारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात हिंसामुक्त, कमी गोंगाट, कमी गोंधळ आणि प्रलोभन आणि दिखाऊपणापासून मुक्त राहिला आहे. चौथ्या टप्प्यापर्यंत देशभरात उत्साहपूर्ण आणि उत्सवाच्या वातावरणात शांततापूर्ण मतदान झाले आहे. याची झलक पाहण्याकरीता आयोगाने नागरिकांना खास तयार केलेल्या फोटो गॅलरीत पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. यासाठी https://www.eci.gov.in/ge-2024-photogallery या लिंकवर जावे.
आतापर्यंत, १६ राजकीय पक्षांच्या २५ शिष्टमंडळांनी आदर्श संहितेच्या कथित उल्लंघनाबाबत त्यांच्या तक्रारी/तक्रार मांडण्यासाठी आयोगाची भेट घेतली आहे. याशिवाय अनेक शिष्टमंडळे राज्यांमध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटली आहेत. भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराशी संबंधित किंवा स्पष्टीकरणात्मक तक्रारी वगळता सुमारे ४२५ प्रमुख तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी ४०० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे किंवा प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांनी अनुक्रमे सुमारे १७०, ९५ आणि १६० तक्रारी दाखल केल्या होत्या. यातील बहुतांश तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. जातीय, धार्मिक, प्रादेशिक भाषा किंवा भारतीय राज्यघटनेच्या पावित्र्याबद्दल शीर्ष स्टार प्रचारकांच्या दुहीकारक विधानांच्या संदर्भात आदर्श आचारसंहिता आणि इतर गोष्टींचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या काँग्रेस आणि भाजपा यांच्या परस्पराविरोधातल्या काही तक्रारी प्रलंबित आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.