पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. देशाचा पंतप्रधान येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो. माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत. पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्षं नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्षं झाली. ५६ वर्षे हा आत्मा शोधतोय की, मोदीसारखी कोणी व्यक्ती आली होती का?, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अहमदनगरमध्ये लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या. कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले. राजीव गांधी पाहिले. नरसिंह राव पाहिले. अनेकांबरोबर काम केले. यांची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एका आत्म्याची चिंता मोदींना वाटते. महाराष्ट्राच्या सामान्य माणसाची, या आत्माची चिंता करणाऱ्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, यासाठी हा आत्मा महाराष्ट्रात फिरतोय, असे शरद पवार म्हणाले.
देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे. आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि दुसऱ्या बाजूने तमिळनाडूमध्ये बघितलं तर तमिळनाडूची निवडणूक एका दिवसात झाली. उत्तर प्रदेशची दोन दिवसांमध्ये झाली. मग महाराष्ट्रातच चार किंवा पाच दिवस का? त्याचे कारण हे आहे, की मोदींना विजयाची खात्री नाही. त्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पुन्हा पुन्हा येता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक त्यांनी बदललं आणि आज या पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत.असा आरोप त्यांनी केला.
लोकशाही म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला आणि तो निर्णय तुम्ही मतपेटीद्वारे घ्यावा याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता सबंध देशात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या ज्या प्रकारे निवडणुका होत नाहीयेत, तसेच चित्र आपल्याला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. ते येऊ द्यायचं नसेल तर वाटेल ती किंमत देऊ, पण लोकशाही आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा निर्णय तुम्हा-आम्हा सर्वांना घ्यायचा आहे, असेही शरद पवार म्हणाले.ही शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.