विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी..’ आणि येथे ‘जनता म्हणजेच देव’ आहे. याच जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली आहे. अस्मिता, विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्यांना जनता कधीच माफ करत नाही. आता जनता तुतारीची पिपाणी करणार यात शंका नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण, सातारा येथे आयोजित भाजपा महाविजय संकल्प सभेत उपस्थित विशाल जनसागराला फडणवीस यांनी काल संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांचे चोरीला गेलेले पाणी परत आणले. या भागात फलटण-बारामती रेल्वे आणली आणि 23 वर्ष बंद असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामासाठी ₹ 921 कोटींची मंजुरी मिळवली. यासोबतच पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर हा सुमारे ₹ 50,000 कोटींचा प्रकल्प त्यांच्याच पाठपुराव्यामुळे सुरू होतो आहे. या कॉरिडॉरभोवती सुरू होणार्या एमआयडीसीमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असे ते म्हणाले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी फलटण हिमालयासारखा उभा असल्याचीच ग्वाही या सभेला उपस्थित जनसागरानेच दिली. यावेळी परभणी लोकसभा महायुती (रासपा) उमेदवार महादेव जानकर, आ. प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.