शुक्रवार आपल्यासाठी अत्यंत स्मरणीय ठरला. कारण या दिवशी भारतीय महिला प्रतिनिधींच्या सामर्थ्यशाली आवाजांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील सभागृह दणाणून गेले. (ईडब्ल्यूआरएस) सीपीडी57च्या “एसडीजींचे स्थानिकीकरण: भारतातील स्थानिक प्रशासनात कार्यरत महिलांची आगेकूच” या विषयावर आधारित अनुषंगिक कार्यक्रमात भारतातील पंचायती राज संस्थांमध्ये कार्यरत लोकनियुक्त महिला प्रतिनिधींनी केंद्रस्थान मिळवत उपस्थितांना आपापल्या प्रेरणादायी कहाण्या आणि परिवर्तनकारी उपक्रमांची माहिती देऊन मंत्रमुग्ध केले.

पंचायत राज संस्थांतील तीन वैशिष्ट्यपूर्ण महिला नेत्या, त्रिपुरातील सुप्रिया दास दत्त, आंध्र प्रदेशातील कुनुकू हेमा कुमारी आणि राजस्थानातील नीरु यादव यांनी बालविवाहाला प्रतिबंध, शिक्षणाला प्रोत्साहन, आर्थिक समावेशन, उपजीविकेच्या संधी, पर्यावरणीय शाश्वतता आणि क्रीडा क्षेत्र यासंदर्भात राबवलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी हाती घेतलेल्या पथदर्शी कार्याने अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या या कथांनी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांच्या नेतृत्त्वात असलेली दृढता तसेच प्रभाव यांचे उदाहरण सर्वांसमोर मांडले गेले.

भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी मिशन आणि केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीसह (युएनएफपीए) एकत्रितपणे न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या सचिवालय इमारतीत या अनुषंगिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या आणि विकासविषयक आयोगाच्या 57व्या बैठकीचा (सीपीडी57) भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पंचायती राज व्यवस्था ही विकेंद्रीकृत सत्ता आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे निदर्शक आहे यावर अधिक भर देत राजदूत रुचिरा कंबोज यांनी कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली. 1.4 दशलक्षाहून अधिक लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या समावेशामुळे, पंचायत राज व्यवस्थेसह भारताची सुरु असलेली वाटचाल महिलांच्या नेतृत्त्वात देशाने घेतलेल्या भरारीला विशेष महत्त्व देत सशक्तीकरण, समावेशन आणि प्रगतीची गाथा सांगते.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले की, लोकशाहीची प्रगती, जिवंतपणा आणि सखोलतेसाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यासाठी अत्यंत मुलभूत पातळीवरील महिलांचे सशक्तीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या “ड्रोन दीदी” आणि “लखपती दीदी” यासारख्या उपक्रमांचे उदाहरण देत, आर्थिक सक्षमीकरणाच्या सुनिश्चितीच्या हेतूने विकास तसेच धोरण हस्तक्षेपांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात पंचायती राज संस्थांनी स्वीकारलेल्या अभिनव दृष्टिकोनावर त्यांनी यावेळी भर दिला.

उपस्थितांशी संवाद साधताना सुप्रिया दास यांनी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था तसेच कार्यकक्षेतील स्वयंसहाय्यता बचत गटांची संख्या 600वरुन वाढवून सुमारे 6,000पर्यंत पोहोचवण्यासह, स्वतःच्या नेतृत्त्वाखाली राबवलेल्या अनेक उपक्रमांची माहिती ठळकपणे मांडली. ‘तुमची कहाणी तुम्ही सांगायलाच हवी’ या प्रभावशाली उपक्रमावर अधिक भर देत त्यांनी महिलांच्या मतांना वाव देण्यासाठी या उपक्रमांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

कुनुकू हेमा कुमारी यांनी यावेळी आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक स्त्रोतांच्या माध्यमातून महिलांसाठी सक्षम वातावरण निर्माण करुन त्यांना आर्थिक स्वावलंबन आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने नेण्याचे महत्त्व अधिक जोरकसपणे मांडले. नीरु यादव यांनी स्वच्छ भारत अभियानासह पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणारे उपक्रम तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांचे दर्शन घडवत,अधिक स्वच्छ तसेच हरित भविष्याच्या उभारणीत महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेची माहिती सांगितली.
