Friday, November 8, 2024
Homeएनसर्कलकरूया संकल्प लोकसंख्या...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.

आज लोकसंख्यावाढ ही केवळ कोण्या देशाची वा प्रांताची समस्या नाही, तर संपूर्ण जगाची समस्या बनलेली आहे. लोकसंख्यावाढीने उदभवलेल्‍या ग्लोबल वार्मिंगची समस्यादेखील प्रचंड मनस्ताप देऊ लागलेली आहे. वाढत्या लोकाद्रेकाने व मानवी गरजांनी निर्माण केलेल्या अनैसर्गिक व तांत्रिक गोष्टींमुळे निसर्गाची भयंकर हानी होऊन निसर्गव्यवस्थेचा विस्फोट होण्याची भीतीदेखील वाढलेली आहे. यामुळेच जागतिक पातळीवर लोकसंख्यावाढीची गंभीर दखल घेतली जात आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.

भारतामधील झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी, महागाई आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्यावाढ ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. कुटूंब कल्याण व कुटूंब नियोजन कार्यक्रमांच्या व्याप्तीमुळे लोकसंख्यावाढीच्या गतीला खीळ बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी असले तरी वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागातील लोकसंख्यावाढीचा वाढता आलेख दखलपात्र ठरतो. ग्रामीण भागामध्ये ‘आशा’ कार्यकर्ती व आरोग्‍य केंद्रांमार्फत कुटूंब नियोजनासाठी लोकप्रबोधनाचे काम उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण आरोग्य विभागासाठी कुटूंब नियोजन व लिंग गुणोत्तरामधील तफावत भरून काढण्‍यासारख्या योजना प्राधान्यक्रमाच्या आहेत.

आज देशाची लोकसंख्या साधारणतः 130 कोटींच्या वर असून यात राज्याच्या लोकसंख्येचा वाटा 12 कोटींच्या आसपास आहे. लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमांमध्ये अधिक व्यापकता आणणे आवश्यक असून सर्व यंत्रणांसाठीच हे एक मोठे आव्हान आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीन ओळखला जातो, ज्याची लोकसंख्या जवळपास १४० कोटी आहे. पण, लोकसंख्‍येच्‍या बाबतीत चीनलादेखील मागे टाकण्याच्या मार्गक्रमणात आपला देश आहे. ही हर्षाची नाही तर गंभीर व विचारमंथनाची बाब आहे.

वाढत असलेल्या लोकसंख्येला आवश्यक सुविधा व पूरक गोष्टी निर्माण करणे हेदेखील एक आव्हान असून यामध्ये देशाला येत्‍या काळात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल. वाढते शहरीकरण व वेडीवाकडी वाढत चाललेली उपनगरे, झपाटयाने वाढत चाललेल्‍या लोकसंख्‍येला अपुरी पडू लागलेली आहेत. या सर्वांचा ताण नागरी सुविधा प्रदान करणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवर पडत आहे. क्षमतेपेक्षा अधिक जनसमुदायामुळे पडणारा अतिरिक्‍त ताण कमी करण्‍यासाठी शहरी भागातील अतिरिक्‍त (अतिक्रमित) बांधकामे पाडण्‍याचे धोरण स्‍वराज्‍य संस्‍थांनी पत्‍करले असले तरी हा उपाय वाढलेले लोंढे कमी करण्‍यासाठी पर्याय ठरू शकत नाही.

लोकसंख्या

आज गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असून श्रीमंत हे अतिश्रीमंत होत आहेत तर गरिबांना दोन वेळचे जेवणदेखील दुरापास्त आहे. लोकसंख्यावाढीचा फटका सर्वात जास्त सर्वसामान्यांनाच बसत असून वाढत असलेली लोकसंख्या केवळ गरीब व श्रीमंत यांच्यातच विभागली जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्र्य, एकवेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. तेव्हा जनतेनेदेखील या बाबीचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

कुटूंब नियोजनाचे नियम समाजातील सर्वच घटकांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत. येणाऱ्या पिढ्यांना समाजात सुखाने व सन्मानाने जगायचे असेल लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाच्‍या प्रयत्नांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत असून याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन दरवर्षी व्‍यापक प्रमाणावर जनजागृतीचे धोरण राबवत असून सामान्य जनतेवर परिणाम करतील अशी विविध घोषवाक्यदेखील जनजागृतीसाठी प्रसिध्‍द करण्यात येतात. ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ ‘लहान कुटुंब सुखी कुटुंब’ ‘हम दो हमारे दो’ अशी अनेक घोषवाक्य सकारात्मक परिणाम घडवत आहेत. पण या जनजागृतीने अपेक्षित बदल घडणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

लोकसंख्यावाढ ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने सामाजिक विकासाला खीळ बसत आहे. उपलब्ध साधनसंपत्तीवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे लोकांना मूलभूत गरजा प्रदान करताना प्रशासनालाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा या लालसेपोटी चार–पाच अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षितपणा असलेल्या कुटुंबात लोकसंख्यावाढीची बीजे रुजल्‍याचे प्रामुख्‍याने दिसून येते. हे सर्व रोखणे काळाची गरज आहे.

आज मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी गर्दीने अगदी हद्दच ओलांडलेली आहे. जिकडे पाहावे तिकडे नुसती माणसेच माणसे. रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थांचा नियमित वापर करणाऱ्या लोकांना याची चांगलीच जाण आहे. ही परिस्थिती अचानक ओढवलेली नसून अनेक वर्षांपासून चालत आलेला लोकांमधील निष्काळजीपणा व अलिप्तवादी वृत्ती याला कारणीभूत आहे. हे कुठंतरी थांबले पाहिजे. कुटुंबकबिला वाढविण्यामध्ये व्यस्त असलेल्या आपल्या समाजाला जागरूकतेची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विचारवंत, साहित्यिक, लेखक व विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्यप्राप्त व्यक्ती खूप मोठी जबाबदारी पार पाडू शकतात.

देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्यावाढ आटोक्यात आणणे आवश्यक आहे. लोकसंख्यावाढ हा अत्यंत संवेदनशील विषय असून ती रोखण्यासाठी व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करून कठोर कायदे, नियम अंमलात आणावे लागतील. त्‍यांची अंमलबजावणीदेखील तितक्‍याच काटेकोरपणे करावी लागेल. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामूहिक प्रयत्नांनी येणाऱ्या काळात लोकसंख्यावाढीच्या भस्मासुरावर आपण निश्चितच मात करू हाच संकल्प आपण आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी करूया. 

Continue reading

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण संतूलन महत्त्वाचे!

कोविड व म्युकरमायकोसिस आजारांबरोबरच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रिटीकरण, नष्ट होत चाललेले जलसाठे व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ही कारणे वाढलेल्या उष्णतेला देता येतील. अनियमित...
Skip to content