छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला. भाजपाचे माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल पेंडसे यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उबाठा शिवसेनेतर्फे बनविण्यात आलेल्या जाहिरातींमधून एक पॉर्न स्टारच जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा सवाल विचारत आहे. आपल्या प्रचारासाठी उबाठा शिवसेनेच्या या जाहिराती पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेनं खाली झुकली गेली. उबाठाच्या निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठवणारा पॉर्न स्टार आणि उबाठा शिवसेना यांचा संबंध काय आहे याचे उत्तर ठाकरे यांनी महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली.

निवडणुकीच्या काळात आणि त्याआधीपासून उबाठा गटाचे नेते महिलांचा वारंवार अपमान करत आहेत. अमरावती येथील महायुतीच्या महिला उमेदवाराबाबत उबाठा नेत्यांनी कोणती भाषा वापरली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यापुढे जाऊन उबाठा शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत उल्लू ॲप या अश्लील ॲपवरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रिकरण करणाऱ्या पॉर्नस्टारच्या माध्यमातून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. जाहिरातीत पित्याची भूमिका करणारा पॉंर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो यासारखी महिलांची क्रूर चेष्टा कोणी केली नसेल. उद्धव ठाकरेंची वैचारिक पातळी इतकी घसरली आहे का, असा सवालही त्यांनी केला.
केंद्रातील मोदी सरकारने आधीच अनेक अश्लील ॲप्सवर बंदी घातली असून उल्लू ॲपवरही बंदी घालावी अशी मागणी वाघ यांनी केली.