Homeटॉप स्टोरीअखेर अमोल कीर्तिकरांविरूद्ध...

अखेर अमोल कीर्तिकरांविरूद्ध रविंद्र वायकर!

अखेर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार रविंद्र वायकर आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काल रात्री उशिरा आमदार वायकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यात वायकर यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या यादीतच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली आहे.

लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. पुढे या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण ही निशाणीही देण्यात आली. मात्र, या काळात गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटातच राहिले. या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी वयोमानामुळे निवडणूक लढविण्यास नकार दिला. तेव्हापासून मुख्यमंत्री शिंदे विजयाची खात्री देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात होते. अमोल कीर्तिकरांची निष्ठा पाहून उद्धव ठाकरे यांनी पहिल्या यादीतच त्यांची उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केली.

वायकर

उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले आमदार रविंद्र वायकर यांनी तब्बल दीड वर्षं एकनाथ शिंदे यांना साथ देण्यास नकार दिला. या काळात त्यांच्यामागे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मुंबई महापालिकेने दिलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रयत्नाची पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीही झाली. या चौकशीत अखेर कोणताही आरोप सिद्ध होईपर्यंत पुढे गेला नाही. दरम्यान वायकरांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र यावेळी त्यांची देहबोली ते बळजबरीने शिवसेनेत दाखल होत असल्याची दिसत होती. त्यामुळेच अमोल कीर्तिकरांविरूद्ध त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. त्याचवेळी अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात ईडीने चौकशीचा फेरा वाढवला. कोरोना काळातल्या खिचडी गैरव्यवहारप्रकरणी त्यांची चौकशी सुरू झाली. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी हाच धागा पकडत कीर्तिकरांवर जोरदार टीका सुरू केली. परिणामी त्यांना काँग्रेसमधून सहा वर्षांकरीता निलंबित करण्यात आले. निरूपम आजही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मनःस्थितीत असून ते याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्याही प्रयत्नात आहेत.

गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले रविंद्र वायकर १९९२ ते २०१२पर्यंत मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेमधून चार वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. या काळात ते चार वेळा मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. २००९ सालापासून सतत तीन वेळा ते जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्रीही होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याविषयी विचारणा केली होती. मात्र, तेव्हा त्यांनी यासाठी तयार नसल्याचे सांगितले होते. काल रात्री मात्र वायकर यांनी याकरीता होकार दिला, असे कळते. एक-दोन दिवसांत वायकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

आशिया कप फायनलमध्ये रंगला ‘क्रिकेट मानापमान’चा प्रयोग!

बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीवर झालेल्या राजकीय रंगरंगोटीच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला आशिया टी-20 क्रिकेट चषक (कप) अखेर दुबईतच राहिला. दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दोन चेंडू राखून सनसनाटी...

मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे ब्रँडच्या प्रमोशनसाठी?

दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवाजीपार्क मैदानाच्या वेशीवर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यावर लाल रंग टाकून त्याची विटंबना करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. खरेतर कोणाच्याही पुतळ्याची विटंबना करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. त्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काही कारणच असू...

‘ठाकरे’ ब्रँड मराठी माणसांचा नाही, तर फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रणकंदन करत आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत...
Skip to content