प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट, या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खानदेखील उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.

जेमतेम ८-१० दिवसांपूर्वीच रमझान ईदच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमान खानची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सदिच्छा भेट म्हणून या भेटीचे वर्णन करण्यात आले असले तरी भाजपाला मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी नवा चेहरा द्यायचा आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या विचारसरणीच्या मतदारांचेही प्राबल्य आहे. आमदार झिशान सिद्दीकी याच परिसरातल्या एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. प्रिया दत्त याच लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे पूनम महाजन यांच्या जागी सलमान खानसारखा उमेदवार दिल्यास भाजपाला पर्यायाने महायुतीला हमखास विजय मिळवता येणे शक्य आहे, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा आहे.
जागावाटपात ही जागा शिवसेनेकडेही जाऊ शकते किंवा भाजपाकडेही राहू शकते. याचदृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सलमानशी चर्चा केल्याचे बोलले जाते. दोनच दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तपासही सुरू केला आणि सलमानच्या सुरक्षाव्यवस्थेतही वाढ केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः सलमानला फोन करून विचारपूस केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत गुजरातच्या भूजमध्ये पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली. मग, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खान कुटुंबाची भेट घेण्याचे कारण फक्त सुरक्षिततेची हमी देण्याकरीता असेल यावर राजकीय क्षेत्रातले जाणकार विश्वास ठेवत नाहीत.