लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार हळूहळू जोर धरत असतानाच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विदर्भातल्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची उद्या, शनिवार दि. १३ एप्रिलला दुपारी ३ वा. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या मैदानात जाहीर सभा होत आहे.
या प्रचारसभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

रविवार, दि. १४ एप्रिल रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे नागपुरातील गोळीबार चौक येथे दुपारी ४ वाजता प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे. त्याआधी सकाळी मल्लिकार्जून खर्गे दिक्षाभूमीला भेट देणार आहेत.
नागपूर, रामटेक, भंडारा-गोदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर या विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून या पाचही मतदारसंघात काँग्रेस व महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा, रॅली, चौकसभा यासह घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्यावरही भर दिला जात आहे. या पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होत आहे.