भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासन देताना आठवले यांनी बीडमधील केज विधानसभा पुढच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आणि पुत्र जीत उपस्थित होते.

भाई संगारे यांना वाहिली आदरांजली
त्याआधी शहीद भाई संगारे यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली वाहिली.
ज्यांच्या शब्दाशब्दांत असायचे अंगारे,
ते होते भाई संगारे..
अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मानत क्रांतीची ज्योत पटविणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाड क्रांतीभूमीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया. शहीद भाई संगारे यांच्या 25व्या स्मृतिदिनी आज सर्व जुने पँथर एकत्र आले आहेत. आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी समाज म्हणून आपण नेहमी एकत्र असले पाहिजे, अशी सामाजिक ऐक्याची साद घालत आठवले यांनी संगारे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईत भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे संगारे यांच्या 25व्या स्मृतिदिनी आयोजित श्रद्धांजली सभेत आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर दलित पँथर चळवळीतील जुने नेते उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरसुद्धा उपस्थित होते. त्यांनी शहीद भाई संगारे यांना श्रद्धांजली वाहणारे भाषण सभेच्या प्रारंभीच केले. यावेळी ज्येष्ठ पँथर तानसेन ननावरे यांनी शहीद संगारे यांचे क्रांती भूमी, महाड येथे स्मारक करावे अशी मागणी केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला.
यावेळी सभागृहात अनेक आंबेडकरी चळवळीतील पँथर कार्यकर्ते उपस्थित होते. दलित पँथर आणि नंतर भारतीय दलित पँथरच्या चळवळीतील अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.