अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर परदेशवारी करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पॅरो विमानतळावर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या संरक्षण दलाकडून मानवंदनाही देण्यात आली. दौऱ्यावर निघताना मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे की, आपण भूतानमधल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून त्यामुळे भारत आणि भूतानमधले संबंध अधिक सुदृढ होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा कालपासूनच सुरू होणार होता. परंतु बुधवारी रात्री उशिरा तो रद्द करण्यात आला. खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय तसेच भूतान सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. पंतप्रधानांच्या भूतान दौऱ्याची पुढची तारीख मात्र जाहीर करण्यात आली नव्हती आणि आज सकाळी अचानक मोदी भूतानला रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सकाळी भूतानला रवाना होणार होते. भूतानच्या पॅरो, या एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरणार होते. तेथून ते थिंफू, या भूतानच्या राजधानीकडे रवाना होणार होते. त्याच मार्गाने दुसऱ्या दिवशी ते मायदेशी परतणार होते. परंतु पॅरो परिसरात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने पंतप्रधान मोदींचा हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना भेटणार आहेत. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्याशीही मोदी चर्चा करणार आहेत.
भारत आणि भूतान यांच्यात परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सद्भावना यावर आधारित अद्वितीय आणि चिरस्थायी अशी भागीदारी आहे. उभयातांतील सामायिक आध्यात्मिक वारसा आणि लोकांमधील जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही देशांमध्ये दृढता आणि चैतन्य वृद्धींगत करतात. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांना स्वारस्य असलेल्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक बाबींवर विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागीदारीचा विस्तार आणि ती अधिक घनिष्ठ करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून देशातल्या विविध राज्यात विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन वा तत्सम कारणांच्या निमित्ताने जाहीर सभांमधून प्रचाराची राळ उडवत होते. भारतीय जनता पार्टीचे ते स्टार प्रचारक म्हणून पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत. अशा व्यस्त दिनचर्येतही पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.
जानेवारीत पदभार सांभाळल्यानंतर भूतानचे पंतप्रधान दाशॊ शेरिंग तोबगे मागच्याच आठवड्यात पाच दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना भूतानच्या राजांच्या वतीने भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते आणि पंतप्रधान मोदींनी ते स्वीकारलेही. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांकडून परस्पर संबंध, सांस्कृतिक तसेच पर्यटन, पायाभूत सुविधा आणि संरक्षणविषयक करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. डोकलामच्या माध्यमातून भूतानवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला एक संदेश देण्याचाही प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमागे असू शकेल, असा जाणकारांचा होरा आहे.