Homeटॉप स्टोरीलोकसभेसाठी सत्ताधारी तसेच...

लोकसभेसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांकडून झाकली मूठ..!

येत्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी काही दिवसांचा अवधी राहिला असतानाच सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी यांच्या उमेदवार निश्चितीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. या चर्चेचे टप्पे अंतिम चरणाकडे झुकले असले तरी डावपेचाचा भाग म्हणून दोन्ही बाजू समोरून होणाऱ्या घोषणांकडे नजर लावून बसल्याचे कळते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्षांची महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडी आघाडी स्थापन करण्याचे मनसुबे रचत होती. यासाठी त्यांच्या काही बैठकाही झाल्या. परंतु नंतर राष्ट्रीय स्तरावरील या आघाडीला भगदाडे पडू लागली. नितेश कुमार दिल्लीतल्या सत्ताधारी एनडीएमध्ये सामील झाले. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तसेच तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपापले उमेदवार निश्चित करण्याची तयारी चालवली. बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे इंडी आघाडीला घरघर लागली. यामध्ये काँग्रेसला सांभाळण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा प्रयोग सुरू केला, जो आजही चालू आहे.

सत्ताधारी

या सर्व घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बळ कायम राहो, विरोधी पक्षांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेद कायम राहवी हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आदींनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ चालू ठेवले. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी चालवली. हे सर्व पाहता मग आंबेडकरांनाही महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. याच प्रयत्नाचा भाग म्हणून प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेच्या बैठका आयोजित करण्याचे ठरले.

सत्ताधारी

दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांबरोबर युतीही केल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापुढील टप्पा म्हणजेच महाविकास आघाडीतला प्रवेश तसेच इंडी आघाडीतला त्यांचा प्रवेश रखडला होता. म्हणूनच आंबेडकर अस्वस्थ होते. त्यानंतर जेव्हा शेवटचे पाऊल आंबेडकरांनी उचलले तेव्हा काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आंबेडकरांनाही सहभागी करून घेण्यात आले. आज मुंबईत फोर सीजन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत, प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांची जवळजवळ साडेचार तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतरही कोणता पक्ष किती जागा लढवणार हे जाहीर करण्यात आले नाही. येत्या नऊ मार्चला पुन्हा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहेत. त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे निश्चित केले जाईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले.

सत्ताधारी

सोमवार रात्रीपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लोकसभेच्या जागावाटपाबाबत बराच खल केला. मात्र सत्ताधारी महायुतीकडूनही जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कोण किती आणि कुठच्या जागा लढवणार हे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी गुलदस्तातच ठेवले आहे.

या चर्चेनंतर काल दुपारीच भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी थेट दिल्ली गाठली. आज रात्री ते दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्रातल्या लोकसभेतल्या जागांबाबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर हे नेते अमित शाह तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर महायुतीतले जागावाटप तसेच जागानिश्चिती अंतिम आकार घेईल, असे सूत्राने सांगितले.

सत्ताधारी

डावपेचाचा भाग म्हणून सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी आपल्या गटातील कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर करण्याची शक्यता नाही. फार फार तर ज्या जागा फक्त एका पक्षाच्याच उमेदवारासाठी खात्रीच्या असतील तेथीलच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र जेथे एकापेक्षा जास्त पक्षांचा उमेदवारीवर दावा असेल त्या जागा अंतिम क्षणी जाहीर केल्या जातील. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते समोरच्या बाजूला म्हणजेच आपल्या विरोधकांच्या बाजूला सरकू नये, याची काळजी घेण्यासाठी म्हणून हे डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content