यजमान स्पोर्टिंग युनियनचा ८ गडी राखून पराभव करुन नॅशनल सी. सी.ने चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मध्यमगती मारा करणाऱ्या सृष्टी पान्डे (१०/४) आणि आर्या उमेश (१०/२) यांनी यजमानांचा डाव केवळ ६६ धावांमध्ये संपविला. अक्षरा सिंगच्या नाबाद ३५च्या खेळीमुळे नॅशनलला आपले लक्ष्य पार करण्यास केवळ ११.३ षटके लागली. याआधी “अ” गटातून साईनाथ स्पोर्ट्सने आपला उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला होता.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमच्या सहाय्याने ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.
स्पर्धेतील “ब” गटातून उपांत्य फेरी गाठण्यासाठी चांगलीच चुरस आहे. एमआयजीने ओरिएंटलचा ५ गडी राखून पराभव करताना दुसऱ्या विजयाची नोंद केली. ओरिएंटलने ९ बाद १२६ असे आव्हान पुढ्यात ठेवल्या नंतर एमआयजीने ते २ चेंडू बाकी असता ५ बाद १२७ अशाप्रकारे पार केले. सलामीच्या अनिषा राऊत (५४) आणि हीर कोठारी नाबाद (३३) यांनी विजयाला मोठा हातभार लावला. या गटातून डॅशिंग सी सी आणि युरोपेम यांच्यातील लढतीअंती स्थिती स्पष्ट व्हावी. डॅशिंगनी ओरिएंटलला ६१ धावांनी पराभूत केल्याने त्यांना युरोपेम विरुद्ध पराभूत झाल्यास धावगतीच्या आधारे पुढे कूच करता येईल असे दिसते. मात्र आपले आव्हान टिकविण्यासाठी युरोपेमला मोठा विजय मिळवावा लागेल.
संक्षिप्त धावफलक
ओरिएंटल सी सी- २० षटकात १ बाद १२६ (दिव्या वर्मा ३३, क्षितिजा सावंत २४, सिद्धी कामटे ३७, ख्याती स्वेन ११/३)
पराभूत वि.
एम आय जी सी सी- १९.४ षटकात ५ बाद १२७ (अनिषा राऊत ५४, हीर कोठारी नाबाद ३३, आर्या सुकाळे नाबाद १७)
सर्वोत्तम खेळाडू- हीर कोठारी
स्पोर्टिंग युनियन- १६.५ षटकात ६६ (भावना सानप १५, सृष्टी पान्डे १०/४, आर्या उमेश १०/२, तनिषा शर्मा ११/२)
पराभूत वि.
नॅशनल सी सी- ११.३ षटकात २ बाद ६७ (अक्षरा सिंग नाबाद ३५, त्विशा शेट्टी २८/२)
सर्वोत्तम खेळाडू- सृष्टी पान्डे
नॅशनल सी सी- २० षटकात ४ बाद १८४ (अक्षरा सिंग २६, गौरी झेंडे ४५, ध्रुवी त्रिवेदी ३१, तनिषा शर्मा नाबाद २६)
विजयी वि.
माटुंगा जिमखाना- २० षटकात ८ बाद ८६ (अनिषा कांबळे ४०, आर्या उमेश ४/२, अनिषा दलाल ४/२, आश्लेषा आचरेकर १४/२)
सर्वोत्तम खेळाडू- आर्या उमेश
डॅशिंग सी सी- २० षटकात ५ बाद १४७ (खुशी निजाई ६४, रचना पागधरे २०, सानया जोशी ४/२)
विजयी वि.
ओरिएंटल सी सी- २० षटकात ८ बाद ८६ (क्षितिजा सावंत ३६, तिशा नायर १४/३)
सर्वोत्तम खेळाडू- खुशी निजाई