Homeडेली पल्स20 लाखांचा महाराष्ट्राचा...

20 लाखांचा महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवारांना!

वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वौच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्चला पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करुन चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील 26 वर्षांपासून पवार आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या ते मराठवाडा आणि खान्देश भागासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वन

राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी कौतुकोद्गार काढले.

चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.

चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2003, भारत जैवविविधता पुरस्कार-2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content