Monday, February 24, 2025
Homeमुंबई स्पेशल३ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर...

३ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढली दीड फुटांची सळई!

सुमारे दीड फूट लांबीची सळई छातीतून आरपार गेलेल्या एका महिलेवर मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग तीन तास एक अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या २९ वर्षीय महिलेचे प्राण वाचविण्यात यश मिळवले. आज एका आठवड्यानंतर सदर महिलेच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका २९ वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना. मात्र, शीव (सायन) परिसरात मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील (सायन हॉस्पिटल) डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढली आणि सदर महिलेचा जीव वाचविला. आता या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडण्यासह समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर यांनी कौतुक केले आहे.

गेल्या शनिवारी म्हणजेच १९ जून २०२१ रोजी विक्रोळी पूर्व परिसरात एका निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत होते. यातील कामगार महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले काम करीत होती. हे काम करत असतानाच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई या महिलेच्या छातीत आरपार घुसली. अत्यंत गंभीर अवस्थेतील या महिलेला तत्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सायन हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले.

सदर महिलेची अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सलग ३ तास सुरू होती.

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील तीन विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेला १२ व्यक्तींचा चमू अथकपणे कार्यरत होता. त्याच दिवशी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले. आता एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या चमूमध्ये शल्यक्रिया विभागातील डॉ. विनीत कुमार, डॉ. रणजीत कांबळे, डॉ. पार्थ पटेल, हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ. कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉ. अमेय, डॉ. प्राजक्ता आणि परिचारिका तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशी माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

Continue reading

अनेक फेस्टिवल गाजवणारा ‘फॉलोअर’ २१ मार्चला चित्रपटगृहात

आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला 'फॉलोअर' हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही...

आता ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत छोट्या दुकानदारांना मिळणार मदतीचा हात

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट वैगेरे वाढत्या ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत आता देशभरातील छोट्या...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया...
Skip to content