Homeचिट चॅटकोमसाप दादरचा मराठी भाषा...

कोमसाप दादरचा मराठी भाषा पंधरवडा संपन्न

अनुयोग विद्यालय, खार व कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने बाल साहित्यावरील कार्यक्रमाचे आयोजन मुंबई अनुयोग विद्यालय, जवाहर नगर, खार (पूर्व) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य सतिशचंद्र (भाई) चिंदरकर, संस्थापक, अनुयोग विद्यालय  यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कोमसापच्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी फरझाना इक्बाल उपस्थित होत्या. तसेच दादर शाखा अध्यक्षा विद्याताई प्रभू, कार्यवाह मनोज धुरंधर, ज्येष्ठ सभासद अशोक मोहिले व अनुयोग शाळेचे मुख्याध्यापक परब यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे निवेदन दादर शाखा कोषाध्यक्ष समीर बने यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुलांनीच हस्तकलेने बनविलेल्या कागदी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमात प्रथम अनुयोग विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे छान सादरीकरण केले. तदनंतर कोमसाप शाखांच्या पदाधिकाऱ्यांपैकी विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाडे, बोरिवली शाखेचे विजय तारी, दादर शाखेचे अशोक मोहिले यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

मान्यवरांपैकी प्रमुख पाहुण्या कवयित्री फरझाना इक्बाल यांनी मुलांना काव्यासंदर्भात व प्रसंगानुरूप कविता कशी लिहावी याचे मार्गदर्शन केले व आपली “खारुताई” या कवितेचे सादरीकरण केले. ते मुलांना खूप आवडले. तदनंतर दादर शाखा कार्यवाह मनोज धुरंधर यांनी मराठी भाषा आणि तिची महती सांगणाऱ्या महापुरूषांवरील एक सुंदर गीत गायले. मुलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नंतर दादर शाखा अध्यक्षा विद्या प्रभू यांनी सर्वप्रथम मुलांना शाळेसाठी, शिक्षकांसाठी टाळ्या वाजवायला सांगितले. अनुयोग विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात ही फार मोलाची संधी आहे असे प्रतिपादन केले. शाळेत जे साहित्यिक, सांस्कृतिक, संस्कारक्षम असे वातावरण आहे हे तुमच्या जडणघडणीसाठी मौलिक, उपयुक्त असे आहे. कदाचित आज याचे मोल तुम्हाला कमी वाटत असेल. पण भविष्यात तुम्हाला अभिमान वाटेल की आपण अनुयोगचे विद्यार्थी आहोत.

पुढे त्यांनी महात्मा गांधीजींच्या शिष्याची ‘नेहमी खरे का बोलावे’ ही गोष्ट सांगितली. यात आपल्या खरे बोलण्याने खोटे बोलणाऱ्यांची संख्या एकाने कमी होईल व स्वत:बद्दल अभिमानाची भावना वाढेल की मी नेहमी खरं बोलतो. नंतर ‘चिमणीची गोष्ट ‘सांगितली. यातून साने गुरुजींच्या जगाला प्रेम अर्पावे या भावनेची, संदेशाची आज गरज आहे हा प्रेमाचा संदेश देऊन आपलं छोटेखानी भाषण संपवलं.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश चिंदरकर सरांनी मुलांना जुन्या सेवा दलाच्या, साने गुरुजींच्या व आपल्याला कविता गोडी लावणाऱ्या त्यांच्या शिक्षकांच्या हृद्य आठवणी सांगितल्या. मुले खूप भावूक होऊन सारं ऐकत होती. त्यांनी आपल्या बालपणीच्या काही कविता ही सादर केल्या. निवेदक कवी समीर बने यांनी सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित शाखांच्या अध्यक्ष, पदाधिकारी सभासद व अनुयोगच्या सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

Continue reading

जनआरोग्य योजनेत आता होणार २३९९ उपचार

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या आता १,३५६वरून २,३९९पर्यंत वाढविण्यात येणार आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या...

राज्यपाल देवव्रत यांच्या शपथविधीलाही अजितदादांची दांडी!

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ...

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...
Skip to content