मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ६ आणि ७ जानेवारी २०२४ यादिवशी साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालसाहित्य’ असा या महोत्सवाचा विषय असून ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होईल. महोत्सवासाठी अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टचे याकामी सहकार्य मिळाले आहे.

६ जानेवारी या दिवशी स्वाती महाळक यांचे ‘असे फुलले बालसाहित्य’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर ‘किलबिल’ हा बालगीताचा कार्यक्रम केंद्राच्या संगीत वर्गाचे विद्यार्थी सादर करतील. त्याच्या सादरकर्त्या वर्षा सोहोनी असून निवेदन सतीश जोशी करतील. रविवार दिनांक ७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ‘बालसाहित्याचा प्रवास’ या शीर्षकांतर्गत कथा, कविता, गीते नाट्यछटा असे बालसाहित्याचे विविध प्रकार सादर करण्यात येतील. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित ‘फुलवा मधुर बहार’ हे बहारदार बालनाट्य सादर होईल. त्याच्या सादरकर्त्या वर्षा भावे असून कलांगणचे बालकलाकार आपली कला सादर करतील.
अधिकाधिक रसिक, साहित्यिक, कलाकार तसेच मुलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.