केंद्रीय रस्ते निधी-सीआरएफमधून महाराष्ट्रातील 91 रेल्वे उड्डाणपूल – आरओबीपैकी 31 आरओबीचे बांधकाम आपण ‘महारेल’ महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने चालू असलेल्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कंपनीला दिले आहे. त्यापैकी 24 पूल त्यांनी बांधून वाहतुकीसाठी तयार केले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण तसेच नागपूर शहरातील 5 पुलाच्या भूमिपूजन समारंभ नागपूरच्या नंदनवन येथील केडीके कॉलेजजवळील गोरा कुंभार चौकात नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटन झालेल्या 9 उडानपुलामध्ये नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वेस्टेशन, काटोल रेल्वेस्टेशन, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वेस्टेशन, नाशिकातील खेरवाडी रेल्वेस्टेशन, जळगाव रेल्वेस्टेशन, सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशन, भिलवाडी रेल्वेस्टेशन या ठिकाणचे रेल्वे उड्डाणपूल तसेच ठाण्यातील तुर्भे उड्डाणपूल त्याचप्रमाणे मुंबईमधील मानखुर्द येथील उड्डाणपूल यांचा समावेश आहे. या बांधकामासाठी सुमारे 629 कोटी रुपये खर्च आला आहे.

तर भूमिपूजन झालेल्या नागपूर शहरातील 5 उड्डाणपुलामध्ये रेशीमबाग चौक ते केडीके कॉलेज चौक, चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक लाडपुरा, लकडगंज पोलीसस्टेशन ते वर्धमान नगर बगडगंज, राजेंद्र नगर ते हसनबाग चौक खरबी त्याचप्रमाणे वर्धमाननगर ते निर्मल नगरी यांचा समावेश आहे. या 5 उडानपुलाच्या कामासाठी सुमारे 792 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याप्रसंगी नागपुरातील विविध विकास कार्याची माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पूर्व नागपुरात नवीन पारडी उड्डाणपुलामुळे अंतर कमी झाल्याने वाहतुकीचा वेळ वाचत आहे.

याप्रसंगी महारेल या उपक्रमाविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही कंपनी महाराष्ट्रामध्ये आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि व्यवस्थापकीय संचालक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने झपाट्याने काम पूर्ण केले.