विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी विधानसभेचे दिवसभराचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, यासाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षांनी सोमवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो, या घोषणांसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, विधानसभेचे कामकाज अकरा वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाले तेव्हा मात्र विरोधी पक्षांनी कोणताही व्यत्यय आणला नाही आणि प्रश्नोत्तराचा तास शांतपणे सुरू झाला.
गुरुवारी आणि शुक्रवारी बाकी सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय चर्चेला घ्यावा, हा आग्रह धरणाऱ्या विरोधी पक्षांनी सोमवारी प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे होण्यासाठी सरकारला सहकार्य केले.

पुण्यातील दहशतवाद्यांवरील कारवाईचे विधानसभेत पडसाद
महेश लांडगे यांनी पुण्यात दहशतवादी कारवायांबद्दलच्या बातम्यांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. मशिदीत छापा मारून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यात भूलतज्ज्ञ डॉक्टरचा समावेश आहे. तेथून चाळीस लोक ताब्यात घेतले आणि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये, ही आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
धारावीत दडपशाही सुरू असल्याचा आरोप
वर्षा गायकवाड यांनी शून्य प्रहरामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे निवृत्त एन्काउंटर स्पेशालिस्ट धारावी भागात फिरून दहशत निर्माण करत आहेत, अशी माहिती विधानसभेला दिली. धारावीमध्ये दडपशाही सुरू झाली असून प्रकल्पग्रस्तांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण केलेले नाही आणि नागरिकांना नोटिसा देऊन दहशत माजवली जात आहे. अदानी ग्रुप आल्यापासून ही दहशत माजवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.