राज्यातल्या कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला पूर्णपणे अपयश आल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्रातला कोरोना नियंत्रणात आणावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरले. केंद्र सरकारने सर्वतोपरी राज्याला मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडले आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
सर्वसामान्य लोकांकडे, महाराष्ट्राकडे राज्याच्या सरकारचे लक्ष राहिलेले नाही. फक्त सत्ता टिकवणे हेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर मदत करावी, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन खपवून घेणार नाही
“महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषा लावला जातो. कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडे मोडले असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? समोर खड्डा आहे हे कळत असून पुनः खड्यात जाण्याची इच्छा आहे का? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करून दरेकर यांनी आज सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यवसाय करणारे, तसेच कष्ट करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५००० रुपये जमा करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
सरकारविरूद्धच गुन्हा दाखल करा
नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेड्स, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानासुद्धा कल्पना दिली होती. परंतु सांगूनही हे सरकार, प्रशासन जागे होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.