Friday, November 8, 2024
Homeएनसर्कलसौंदर्य, माधुर्य आणि...

सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने नटलेली मराठी!

दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. अत्यंत अवीट गोडी असलेल्या तसेच सौंदर्य, माधुर्य आणि विविधता यांनी नटलेल्या आपल्या मराठी मायबोलीचे जतन आणि जोपासना करणे हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे. आपल्या मायबोलीचे जतन आणि जोपासना करणे यासाठी सर्वांनाच स्फूर्ती मिळो आणि त्याप्रमाणे प्रयत्न होवोत, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके । – ज्ञानेश्‍वरी, अध्याय ६, ओवी १४

अर्थ: माझे बोल निवळ मराठीत आहेत, हे त्याचे कौतुक खरे; परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील.

असे संत ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेचे वर्णन करताना सांगितले आहे. मराठी भाषा संस्कृतनंतर जगातील सर्वांत सात्त्विक भाषा आहे. नादब्रह्माची अनुभूती देणार्‍या मराठी भाषेच्या अंगभूत सात्त्विकतेचा लाभ आपण स्वतःच्या आचरणातून घ्यायला हवा. यासाठी प्रत्येकानेच शुद्ध मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करायला हवा; कारण जेथे उच्चारांची शुद्धता असते, तेथे पावित्र्य असते आणि तेथेच ईश्‍वरी तत्त्व आकृष्ट होते.

मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. मराठी भाषेतील शब्दांची जागा इंग्रजी, उर्दू, फारशी आदी भाषांतील शब्दांनी घेतली आहे. मराठीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. त्यामुळे मराठी भाषेतील शुद्धत्व, सोज्वळता हरपत चालली आहे. सौंदर्य लोपवणारे स्वरूप तिला येत चालले आहे. ती तेजोहीन झाली आहे आणि काही तुरळक भाषाभिमानी वगळता याला कोणीही विरोध करत नाहीत.

‘मराठी भाषा सर्वसमावेशक असून तिच्यात अन्य भाषांतील शब्द सहजतेने सामावले आहेत. त्यामुळे ती व्यापक आहे’, असे काही आंग्लाळलेल्या विद्वानांचे म्हणणे आहे. परंतु ‘भाषाभिमानाचा संबंध थेट राष्ट्राभिमानाशी आहे’, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राप्रमाणेच मराठी भाषेवरही यवनी सत्तेकडून करण्यात आलेली आक्रमणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी परतवून लावली. त्यानंतर भाषेवर झालेल्या इंग्रजीच्या आक्रमणाला परतवून लावण्याचे कार्य निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य सर्व आंदोलने सांभाळून भाषाशुद्धीचे कार्य अनेक वर्षे चालवून ते नेटाने पुढे नेले. दैनंदिन व्यवहारात अनेक स्वकीय शब्द वापरायची सवय महाराष्ट्राला झाली ती सावरकरांमुळेच!

मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे. शब्दांच्या विविध छटा असलेल्या मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. र्‍हस्व आणि दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास अर्थात होणारे पालट, चिन्हांचे (एकेरी अवतरणचिन्हे, स्वल्पविराम यांचे) स्थान पालटल्यामुळे वाक्याच्या अर्थावर होणारा परिणाम, अक्षरावर अनुस्वार दिल्यामुळे होणारे दोन अर्थ, वाक्यरचना आणि व्याकरण न पालटता दोन अर्थ होणारी वाक्ये या लेखात दिली आहेत. तसेच मराठी भाषेतील काही गंमती आणि विनोदही येथे दिले आहेत. अर्थाने परिपूर्ण नटलेले शब्द असणारी ही एकमेव भाषा असावी.

मराठी भाषा देवाने दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. समृद्धता, परिपूर्णता आणि मधुरता यांनी वैभवसंपन्नता प्राप्त झालेल्या या भाषेतील शब्दभांडाराचा आनंद सर्वांनाच घेता यावा, यासाठी त्यातील अनमोल रत्नांपैकी काही तुरळक (शब्द) रत्ने आम्ही येथे दिली आहेत. स्वतःसमवेत अर्थाचा प्रकाश घेऊन येणारी ही शब्दरत्ने धारणकर्त्याला आनंद तर प्रदान करतातच, तसेच समृद्धही करतात. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी आदी संतांनी विविध प्रकारचे गद्य आणि पद्य यांच्या सुंदरतेने आभूषित केलेल्या आणि जगभर गौरवलेल्या या मायबोलीची अवीट गोडी खर्‍या अर्थाने अनुभवण्यासाठी तिच्या निकटतम सहवासाची (अभ्यासाची) आवश्यकता आहे. तरच सांदीकोपर्‍यात पडलेल्या (टाकलेल्या) आपल्या मायबोलीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल आणि खर्‍या अर्थाने तिचा तो सन्मान होईल.

१. भाषाशुद्धीचे महत्त्व

‘तांदूळ नीट निवडलेले नसले, तर जेवताना खडा लागतो आणि जेवणातला आनंद न्यून होतो. त्याप्रमाणे लिखाणात किंवा बोलण्यात इतर भाषांतील शब्द आल्यास त्यातील आनंद न्यून होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. व्याकरणाचे महत्त्व

मराठी भाषेत शब्दांना लागणार्‍या काना, मात्रा, अनुस्वार, स्वल्पविराम, संधी, विभक्ती, प्रत्यय इत्यादींच्या वापराला महत्त्व आहे; कारण त्यांच्या अनाठायी वापराने शब्दाचा अर्थ पालटतो. छोट्याशा स्वल्पविरामानेही अर्थाचा अनर्थ होतो.

अ. ‘शत्रूको रोको, मत जाने दो’ याऐवजी ‘शत्रूको रोको मत, जाने दो’, असे लिहिल्यास भलताच गोंधळ होईल.

आ. ‘अनसूया’ (अन् + असूया) म्हणजे ‘द्वेष नसणारी’ हे नाव ‘अनसुया’ असे चुकीचे लिहितात.

इ. दूरदर्शनवर ‘मनापासून’ (?) हार्दिक अभिनंदन’, ‘दुर्दशन (दूरदर्शन)’, ‘माझी मदत करा’, इत्यादी अनेक विषयांत मराठीचे व्याकरणरहित आधुनिकीकरण झाले आहे!

३. व्याकरण अशुद्ध लिहिल्यास एकाच वाक्याचे होणारे दोन वेगवेगळे अर्थ

३ अ. र्‍हस्व, दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास अर्थात पालट होणे

१. रवि / रवी

अ. रवि – सूर्य

आ. ताक घुसळण्याची रवी

२. विट / वीट

अ. विट – बांधकामात वापरली जाते ती

आ. वीट – कंटाळा येणे या अर्थी

४. विरामचिन्हांचे स्थान पालटल्यामुळे वाक्याच्या अर्थावर होणारा परिणाम

लिखाण वाचताना कोठे आणि किती थांबावे, कोठे प्रश्‍नचिन्ह किंवा उद्गार काढावा, आवाजात कोठे चढ-उतार करावा, तसेच पूर्ण आणि अपूर्ण विधान कोणते, हे विरामचिन्हांमुळेच कळणे शक्य होते. या चिन्हांमुळे बोलणार्‍या व्यक्तीचे तिच्या बोलण्यामागील भाव समजतात, म्हणजेच तिच्या बोलण्याचा खरा आशय समजतो. लिखाणात विरामचिन्हांचा वापर चुकीच्या ठिकाणी केल्यास संबंधित वाक्याचा अर्थच पालटून (बदलून) जातो, तर या चिन्हांचा वापर न केल्यामुळे वाक्याचा अर्थबोधच होत नाही. विरामचिन्हांचा अचूक वापर करण्याचे महत्त्व लक्षात येण्यासाठी पुढे काही उदाहरणे दिली आहेत.

स्वल्पविराम

स्वल्पविरामाचा उपयोग योग्य ठिकाणी न केल्यामुळे वाक्याचा अर्थ पालटणे

अ. ‘नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ नसणार्‍यांना पाठिंबा देणार नाही’, असे विहिंपने म्हणावे!

मूळ वाक्य : ‘नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे, हिंदुत्वनिष्ठ नसणार्‍यांना पाठिंबा देणार नाही’, असे विहिंपने म्हणावे!

स्वल्पविराम योग्य ठिकाणी न लिहिल्यामुळे अर्थात झालेला पालट: ‘नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ नसणार्‍यांना, पाठिंबा देणार नाही’, असे विहिंपने म्हणावे!

आ. ‘बाबा तुम्हाला मारतील’

मूळ वाक्य : बाबा, तुम्हाला (ते) मारतील.

स्वल्पविराम योग्य ठिकाणी न लिहिल्यामुळे अर्थात झालेला पालट: (माझे) बाबा तुम्हाला मारतील.

५. अर्थहीन शब्दाला आणखी एक शब्द जोडला जाऊन तो भाषेत वापरला जाणे

अ. कडेवर: एरव्ही ‘त्याच्यावर’, ‘वस्तूवर’, ‘ग्रंथावर’ अशा शब्दांमध्ये ‘त्याच्या’, ‘वस्तू’, ‘ग्रंथ’ अशा कुठल्यातरी अर्थ असलेल्या शब्दाला ‘वर’ हा शब्द जोडला जातो आणि पूर्ण शब्द सिद्ध होतो. हे शब्द सिद्ध होतानाही ‘त्याच्या’, ‘वस्तू’, ‘ग्रंथ’ या शब्दांच्या अर्थांना महत्त्व असते; परंतु ‘कडे’ या शब्दाला ‘कडेवर’ या शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने काहीच अर्थ नाही. तरीही त्याला ‘वर’ हा शब्द जोडला जाऊन ‘कडेवर’ हा शब्द सिद्ध झाला आहे आणि तो ‘कटीवर’ या अर्थाने भाषेत वापरला जात आहे.

आ. करकर: ‘कर’ म्हणजे ‘हात’ आणि ‘कर’ म्हणजे ‘एखादी गोष्ट कर’ असे दोन अर्थ आहेत. मग ‘करकर’ म्हणजे काय ? (मराठीतील नादानुकारी; पण अर्थहीन शब्द) + ‘कर’ म्हणजे इंग्रजी ‘टॅक्स’ या अर्थानेही हा शब्द वापरला जातो.

६. दोन्ही वाक्ये व्याकरणदृष्ट्या योग्य असणे

अ. वाक्यात ‘तिने’ व ‘ती’ हे दोन्ही शब्द योग्य असणे

१. तिने लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती.

२. ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती.

आ. वाक्यात ‘पुरुषांनी’ व ‘पुरुषांना’ हे दोन्ही शब्द योग्य असणे

१. पुरुषांनी अलंकार आणि फुले घालण्याची आवश्यकता नसते.

२. पुरुषांना अलंकार आणि फुले घालण्याची आवश्यकता नसते. 

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज

मराठी भाषिकाने माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे, याचे भान ठेवून आपला भाषाभिमान सतत जागृत ठेऊया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊया. 

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ’

संपर्क क्र. :  9920015949 

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content