पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी होत असलेला पोलीस तपास संदिग्ध असून पूजाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली.
चित्रा वाघ यांनी राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे एक निवेदन दिले. पूजा चव्हाणच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. तिने आत्महत्त्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला, असे पोलीस म्हणत आहेत. तिच्या आई-वडिलांनी आमची कोणाविरूदध तक्रार नाही असे म्हटले आहे. मात्र, तिची आजी आणि भावाने पूजा आत्महत्त्या करणारी मुलगी नव्हती. तिची हत्त्या झाली असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप बाहेर आल्या असून त्यात पूजाला आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नांपासून आत्महत्त्येनंतर दरवाजा तोड, पण मोबाईल ताब्यात घे, सांगण्यापर्यंतच्या संभाषणाचा समावेश आहे. हा आवाज राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. पूजा राठोड त्यांच्या संपर्कात होती, याचे काही फोटोही दिसत आहेत. इतके ढळढळीत पुरावे असताना पुणे पोलीस मात्र संजय राठोडविरूद्ध कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. राठोड अद्याप बेपत्ता आहेत, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय हा अहवाल तयार करण्यात आला. राठोड यांच्या चौकशीशिवाय हा अहवाल कसा काय तयार केला जाऊ शकतो? पूजाचा लॅपटॉप, मोबाईल, पोलिसांना मिळाले का, त्यातून काही माहिती समोर आली का, ऑडिओ क्लिपची तपासणी झाली का, पूजासोबत राहणाऱ्या दोघांची जुजबी चौकशी करून पोलिसांनी त्याना कसे काय जाऊ दिले, सध्या हे दोघेही फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे वाघ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी याप्रकरणाच्या चौकशीत लक्ष घालण्याचे आश्वासन यावेळी दिले.