Friday, October 18, 2024
Homeमाय व्हॉईसलतादीदींना भावांजली...!

लतादीदींना भावांजली…!

आज लतादीदींचा पहिला स्मृती दिन… खरंतर माझ्यासारख्या ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, माया लाभली त्यांच्यासाठी किंवा ज्यांना त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही त्यांच्यासाठीही गेल्या वर्षातला प्रत्येक दिवस हा स्मृतिदिनच होता… त्यांचं प्रत्येक गाणं त्यांची स्मृती जागृत करत होतं आणि आपण काय गमावलं आहे याची बोच निर्माण करत होतं… मला तर तब्बल अकरा वर्षं त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी असंख्य विषयांवर बोलता आलं. त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. त्यांच्या मायेचा, त्यांच्या दिलदारीचा, त्यांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेता आला… त्यामुळे माझ्या मनातली त्यांची स्मृतीयात्रा अविरत चालूच राहिली व राहील. त्यामुळेच त्या अलौकिकत्वापुढे कृतज्ञतेची एक छोटीशी पणती उजळण्याचा हा प्रयत्न…

त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूपच होतं. स्वरसम्राज्ञी म्हणून त्यांची थोरवी सगळ्यांनाच माहित आहे, पण ज्या तऱ्हेने त्या त्यांचं आयुष्य जगल्या… जीवनाच्या पुस्तकातून त्यांनी जे जे वेचलं ते ते त्यांच्याकडून ऐकणं हा अद्भुत अनुभव होता. ज्या वयात वांडपणा करायचा त्या वयात त्यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. अबोधपणा संपला नव्हता, पण प्रौढत्वाची झूल मात्र अंगावर पांघरावी लागली होती. एकीकडे अबोधपणा आणि दुसरीकडे प्रौढत्व या द्वंद्वात त्यांचा प्रवास सुरू झाला होता… त्या काळातल्या त्यांच्या आठवणी खूप मनोज्ञ आहेत… त्यांना किती स्तरावर स्वतःला घडवावं लागलं याच्या निदर्शक आहेत आणि अर्थातच म्हणूनच त्या प्रेरक आहेत.

एकदा त्या सांगत होत्या की, मास्टर विनायकांच्या कंपनीबरोबर त्या मुंबईत आल्या. त्यानंतर लगेचच एकदा चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी त्यांच्या घरी एक पार्टी ठेवली होती. दीनानाथांची मुलगी विनायकांच्या कंपनीत काम करते म्हणून त्यांनी विनायकांना तिलाही सोबत घेऊन यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मा. विनायक दीदींना बरोबर घेऊन त्या पार्टीला गेले. तिचा परिचय करून देताना त्या उत्तम नकलाही करतात हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे व्ही. शांताराम यांनी दीदींना कोणाची तरी नक्कल करायचा आग्रह केला. अशा पार्ट्यांमध्ये किंवा अशा वातावरणात वावरायचं कसं हा अनुभव तोवर दीदींना आलेला नव्हता. त्यामुळे त्यांचे बाबा असताना त्या जो वांडपणा करत तो वांडपणा त्यांच्यामध्ये शिल्लक होता. नक्कल कर म्हटल्यावर त्यांनी व्ही. शांताराम यांच्या पत्नी जयश्रीबाई यांच्याच एका गाण्याची त्यांच्यासमोर सही सही नक्कल केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण जयश्रीबाईंना मात्र त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं आणि त्या रागावून निघून गेल्या. तेव्हा दीदींना आपलं काहीतरी चुकलं आहे याची जाणीव झाली.

प्रगल्भतेच्या मार्गावरचं त्यांचं एक पाऊल पुढे पडलं… नंतरचा एक किस्सा असाच आहे. तोवर त्या यशस्वी झाल्या होत्या. भरपूर गाणी त्यांच्याकडे येत होती. माईला तिचं वैभव परत मिळवून द्यायचं आणि भावंडांना त्यांच्या पायावर उभं करायचं या ध्यासाने झपाटल्यासारख्या त्या एकेक कप चहावर दिवसाला सहा-सहा, आठ-आठ गाणी रेकॉर्ड करत होत्या. डोक्यावर छत्र नव्हतं. कोणी सांगणारं नव्हतं. त्यामुळे इन्कम टॅक्स वगैरेही भानगडच त्यांना माहीत नव्हती. पैसे मिळाले की ते आणून माईंकडे द्यायचे एवढंच त्यांना माहीत होतं. परिणामी दोन वर्षं त्यांचा इन्कम टॅक्स भरला गेला नाही. एक दिवस सकाळी त्या रेकॉर्डिंगला जाण्यासाठी म्हणून निघाल्या. त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या तर समोर हॉलमध्ये काही लोक बसले होते. ते इन्कम टॅक्स अधिकारी आहेत असं दीदींना सांगण्यात आलं. इन्कमटॅक्स भरला नाही म्हणून ते वसुलीसाठी घरी आले होते. रक्कम फार नव्हती; पण तेव्हा दीदींना इन्कम टॅक्सविषयी समजलं. मात्र रेकॉर्डिंगला उशीर होत होता. त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्या अधिकाऱ्यांना त्या असं म्हणाल्या की, आता मला रेकॉर्डिंगला जायचं आहे. वेळ नाही. त्या रकमेच्या बदल्यात तुम्ही माझी गाडी घेऊन जाता का? मी उद्या येऊन ती रक्कम भरीन. त्यांनी ते मान्य केलं आणि ते निघून गेले.

दीदी पुन्हा गाण्याच्या विचारात गर्क झाल्या. त्या खाली आल्या तर गाडी खालीच होती. ते ती घेऊन गेले नव्हते. त्यात बसून त्या रेकॉर्डिंगला निघून गेल्या. रात्री दोन-तीन वाजता परत आल्या तेव्हा झोपायला जाताना त्यांना सकाळचा किस्सा आठवला. मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्या ते पैसे भरून आल्या… मात्र विचार केला तर त्या वयात, डोक्यावर कोणाचंही छत्र नसताना त्या किती किती आघाड्यांवर लढत होत्या हे लक्षात येतं.

प्रगल्भतेच्या वाटेवर त्यांचं आणखी एक पाऊल पुढे पडलं होतं… त्यामुळेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं. विशेषतः इतकं अलौकिक यश मिळवून त्यांचा जो साधेपणा होता, नम्रपणा होता तो अनुकरणीय होता. एकदा मी त्यांना विचारलं की तुमच्या काळातल्या हिरॉइन्स किती फॅशन करायच्या… तुम्हीही तरुण होतात, मग तुम्हाला नाही का वाटलं तसं करावं? त्या म्हणाल्या, ‘नाही. मला बाबांनी (भालजी पेंढारकर) असं सांगितलं होतं की आपल्याला शोभेल तेच करावं. आणि बायकांना साडीच शोभते असं मला वाटतं. साधेपणातच सौंदर्य असतं!’

मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा-तेव्हा प्रत्येकवेळी त्यांनी मला साडी भेट दिली. आणि ती साडी देताना प्रत्येकवेळी त्यांनी मला हेच सांगितलं की तुम्ही साडी नेसत जा. तुम्हाला साडी छान दिसते… त्या सगळ्या साड्या माझ्याकडे आहेत, पण त्या देणाऱ्या लतादीदी मात्र नाहीत… ही खंत कधीच न मिटणारी… त्यांना विनम्र भावांजली. 

Continue reading

नमन लतादीदींना..

लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं गाणं.. त्यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य आठवणी.. आईच्या मायेने त्यांनी केलेला आग्रह, त्यांचं आगत्य, त्यांचा ‘परफेक्शन’चा अट्टहास.....

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात....

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे. २०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही...
Skip to content