गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अशा व्यभिचारी प्रेमाला मुळीच थारा नाही. भारतीय संस्कृतीने प्रेमाला कधीच नाकारले नाही. उलट भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाला पवित्र मानले जाते. प्रेमाला उच्च स्थान दिले गेले आहे. त्यामुळे भारतीय तरुण-तरुणींनी भोगवादी प्रेमाला बळी न पडता निरपेक्ष प्रेम शिकवणार्या भारतीय संस्कृतीचा आदर्श बाळगणे, हाच खरा प्रेमाचा आदर्श ठरेल.
१. खरंच ‘व्हॅलेंटाईन’ याचा आदर्श घ्यावा, असा तो होता का?
अ. राजाज्ञेचा अवमान करणारा व्हॅलेंटाईन:
तिसर्या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री (प्रीस्ट) होता. त्या काळातील क्लॉडीयस २ राजाने एक नियम लागू केला की, बायका-मुले असलेल्या पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष चांगले सैनिक असतात; म्हणून युवा मुलांनी विवाह करू नये. व्हॅलेंटाईनला हे अयोग्य वाटले आणि त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता लपूनछपून प्रेमींचे लग्न लावणे चालू केले. जेव्हा राजा क्लॉडीयस २ ला हे कळले, तेव्हा त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला.
आ. व्हॅलेंटाईनचे तुरुंगाधिकार्याच्या मुलीसमवेत प्रेम:
रोमच्या कारागृहात असलेला व्हॅलेंटाईन कारागृहातील तुरुंगाधिकार्याच्या तरुण मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला पत्र पाठवले. व्हॅलेंटाईनच्या मृत्यूपूर्वी त्याने तिला एक पत्र पाठवले आणि त्यात तुझ्या व्हॅलेंटाईनकडून असे लिहिले. तेव्हापासून आजही असे लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.
हिस्ट्री.कॉम या संकेतस्थळावर या दिवसाविषयी वरील माहिती दिली आहे.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची तथाकथित कारणे:
अ. काही लोकांचे मत आहे की, व्हॅलेंटाईनची पुण्यतिथी साजरी करायला फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.
आ. पाचव्या शतकाच्या शेवटी पोप जीलेसियसने १४ फेब्रुवारी या दिवसाला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केला. या दिवसाचा प्रेमाशी संबंध बर्याच काळानंतर स्थापित झाला.
३. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी कोट्यवधी रुपयांचा अपव्यय:
व्हॅलेंटाईन डे विश्वभरात विशेषतः अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत साजरा केला जातो आणि आताच्या काळात हा दिवस भारतातही साजरा होतो. भारतात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांना विशेष महत्त्व असते. यावेळी फुलांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारून लोकांना लुटले जाते. यांसह शुभेच्छापत्रे, पर्यटन, उपाहारगृहे यातूनही देशभरात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असते.
४. तरुण-तरुणींना भरकटवणारा दिवस!
व्हॅलेंटाईन डे ख्रिस्ती पंथाशी निगडित आहे. हिंदू धर्मात जे काही सण, उत्सव साजरे केले जातात, त्यांना आध्यात्मिक तत्त्वांचा आधार असतो, उदा. दत्त जयंती, गणेश चतुर्थी, श्रीरामनवमी इत्यादी. यादिवशी त्या-त्या देवतांचे तत्त्व (दत्ततत्त्व, गणेशतत्त्व, श्रीरामतत्त्व) म्हणजेच त्या देवतांची शक्ती पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात येत असल्याने सर्वांना त्याचा लाभ होतो. हिंदू धर्मातील संतांच्या पुण्यतिथीला त्या-त्या संतांचे तत्त्व सर्वांना मिळते. व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, पाश्चात्त्य विचारसरणीचे (ख्रिस्ती पंथाचे) आहेत. यादिवशी प्रेम, माता, पिता आणि मैत्री यांचे तत्त्व पृथ्वीवर येत नसल्यामुळे त्याचा कुणालाही लाभ होत नाही. म्हणूनच असे दिवस साजरे करणे म्हणजे आपण आणि देश यांची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक हानी करणे आहे.
५. तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या!
अ. हिंदू धर्मात प्रेमाला अभिचारी नाही, तर पवित्र मानले आहे!
हिंदू धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदू धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या निरपेक्ष प्रेमाला श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती (निरपेक्ष प्रेम) हा गुण विकसित करता येत नाही. मग हिंदू धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार?
आ. व्हॅलेंटाईन डे साजरा करून प्रेम आपोआप वाढत नाही!
केवळ असे दिवस साजरे केल्याने आपल्यात प्रेम आणि मैत्री आपोआप कशी काय वाढणार? आपल्यात प्रेमभाव वाढण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे काही काळाने आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो.
इ. व्हॅलेंटाईन डेलाच प्रेम व्यक्त करता येते, असे नाही!
मुला-मुलींचे एकमेकांवर प्रेम होणे नैसर्गिक आहे. व्हॅलेंटाईन डे नसला, तरीही ते एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करू शकतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला मुला-मुलींनी प्रेम व्यक्त केले नाही, तर पुढे कधीही ते प्रेम व्यक्त करू शकणार नाही, असे होऊ शकत नाही. व्हॅलेंटाईन डे भारतात साजरा होत नव्हता; तेव्हा मुला-मुलींमध्ये प्रेम नसायचे का?
६. हिंदू युवक-युवतींनो, हे लक्षात घ्या!
अ. स्वत:चे यौवन देशासाठी अर्पण करणार्या क्रांतीकारकांना विसरू नका!
आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीपेक्षा कुटूंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश जास्त महत्त्वाचा आहे. हाच दृष्टीकोन ठेवून भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्या अनेक विरांनी आपले यौवन अर्पण केले आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा संदेश मानून ते लग्न करून बसले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते का?
आ. हिंदू धर्माच्या आचरणाने जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाता येते, हे लक्षात घेऊन धर्माचरण करा!
व्हॅलेंटाईन डे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदू धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्या सुखाच्याही पुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदू धर्माच्या शिकवणीत आहे. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेसारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदू धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्त करा. लक्षात ठेवा, जो धर्माचे पालन करतो, त्याचे धर्म पालन (पोषण) करतो.
७. ‘१४ फेब्रुवारी’ हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या!
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या माता-पित्यांना एकत्र आणून त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्याविषयी सामूहिकरित्या प्रेम व्यक्त करणे, असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सध्या देशात स्वतःच्या अपत्यांकडून देखभाल होत नसलेल्या वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे या नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक समस्येविषयी सरकारही चिंतित असून त्याविषयी सामाजिक दृष्टीकोनातून प्रबोधन करत आहेत. ‘मातृ-पितृ पूजनदिन’ या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागते. त्यामुळे ‘मातृ-पितृ पूजनदिना’चे आयोजन करणे, हे एकप्रकारे शासकीय धोरणांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. शालेय स्तरावर असे दिवस साजरे होत नसले, तरी प्राथमिक-माध्यमिक वर्गातील विद्यार्थीच पुढे युवक बनून महाविद्यालयांत जात असल्याने असे दिवस साजरे न होण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे. तरी शाळांमधूनही ‘मातृ-पितृ पूजनदिन’ हा उपक्रम साजरा होण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांचे प्रमाण पाहता शिक्षणाधिकार्यांनी प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे तोटे सांगावेत आणि भारतीय संस्कृतीची माहिती देणार्या व्याख्यानांचे आयोजन करण्याविषयी निर्देश द्यावेत. तसेच या संदर्भातील लेखी निर्देशही सर्व प्राचार्यांना देण्यात यावेत. जागृत हिंदूनी या भूमिकेला एकजुटीने पाठिंबा द्यायला हवा. आजपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती सोडून आपल्या उच्च संस्कृतीनुसार आचरण करूया!