९ व १६ महिन्यांच्या बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण पूर्ण करा!

गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरणाची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देणे गरजेचे असते. या दोन्ही मात्रा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, सर्वसामान्य रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे मोफत उपलब्ध आहेत. सबब, सर्व पालकांनी आपल्या ९ महिन्यांच्या व १६ महिन्यांचे बालकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात नियमितपणे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. या लसीकरण  कार्यक्रमात ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ, कावीळ, क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, रुबेला, गालगुंड व रोटा व्हायरस-डायरिया, न्युमोनिया यासारख्‍या आजारांपासून व गर्भवती महिलांचे लसीकरण करुन नवजात बालकांना धनुर्वात आजारापासून संरक्षित करण्यात येते. सदर नियमित लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे सन २०१४पासून भारत पोलिओमुक्त झाला आहे. नवजात बालकांमध्ये धनुर्वात आजाराचे निर्मूलन झाले आहे. त्याचप्रमाणे, गोवर, रुबेला या आजाराचे डिसेंबर २०२३पर्यंत निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवून त्यादिशेने वाटचाल सुरू आहे.

मागील काही आठवड्यात मुंबईतील एफ/उत्तर विभाग, एच/पूर्व विभाग, एल विभाग, एम/पूर्व विभाग तसेच पी/उत्तर विभागात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये गोवर / रुबेला आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले आहे. एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने या विभागांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर, रुबेलाच्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके अर्धवट लसीकरण झालेली व २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत.

गोवर या आजारामध्ये बालकास ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पुरळ येते. अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरुपाची होऊ शकते. उदा. फुफ्फुस दाह (Bronchopneumonia), अतिसार (Diarrhoea), मेंदुचा संसर्ग (Encephalitis) तसेच गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भातील बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांमध्ये अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नसते.

महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या रुग्णांची संख्या इतरत्र वाढल्याचे आढळून आले आहे. यास्तव, गोवर व रुबेला या आजाराची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात यावी. गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते. गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो.

वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content