Homeचिट चॅटतबला, वीणा आदींनी...

तबला, वीणा आदींनी नटलेले संगीतकार अनिल मोहिले उद्यान!

मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या मुंबई महापालिकेच्या उद्यानाला संगीतकार अनिल मोहिले यांचे नाव देण्यात आले आहे. संगीतकार मोहिले यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाचे अस्तित्त्व पूर्वी फक्त नावापुरतेच होते. आता मात्र ते फार सुंदररित्या सुशोभित करण्यात आले असून ते खऱ्या अर्थाने संगीतकार मोहिले यांना समर्पित करण्यात आले आहे.

मोहिले

अंधेरी (पश्चिम) परिसरात असणाऱ्या या उद्यानात विविध संगीत वाद्यांच्या भव्यदिव्य आकारातील आकर्षक व प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींची डागडुजी, रंगरंगोटी करण्यासह परिरक्षणाची कामेदेखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे या उद्यानाला एक नवी झळाळी व देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. या उद्यानामध्ये विविध वाद्यांच्या प्रतिकृतींसह मुलांसाठी खेळणी, खुली व्यायामशाळा, योगकेंद्र इत्यादी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्यानातील पदपथांच्या कडेलाच असणाऱ्या ध्वनिक्षेपकांमधून संगीत ऐकविण्याची व्यवस्थाही निर्धारित वेळी करण्यात येते.

मोहिले

अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या नेतृत्त्वात व उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या पुढाकाराने या उद्यानामध्ये विविधस्तरीय कामे करण्यात आली आहेत. या उद्यानास नवीन झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता केवळ या परिसरातील नागरिकच नव्हेत, तर परदेशी पर्यटकदेखील या उद्यानास भेट देत आहेत.

संगीत उद्यान म्हणून विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण २३ डिसेंबर, २०१६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. अंधेरी (पश्चिम) येथील चार बंगलानजीक मॉडेल टाऊन परिसरात असणाऱ्या या उद्यानाची काही ठळक वैशिष्ट्यं..

• हे उद्यान तब्बल १ लाख १ हजारांपेक्षा अधिक चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात बहरलेले आहे.

मोहिले

• या उद्यानात तबला, संवादिनी (हार्मोनियम), वीणा, सितार, गिटार इत्यादी विविध वाद्यांच्या प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींसोबत सेल्फी, छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची व विशेष करुन लहान मुलांची लगबग नेहमीच दिसून येते.

• या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर व प्रवेशद्वारानजीकच्या भिंतीवरदेखील विविध वाद्यांच्या प्रतिकृती चितारलेल्या आहेत. यानुसार उद्यानातील भिंतींवर की-बोर्ड, मृदुंग, तबला-डग्गा व संगीतचिन्हांचा वापर करुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

• या उद्यानात पुष्पवाटिका, पुष्पकुंज यासह फुले असणाऱ्या वेलींनी सुशोभित केलेला ‘पुष्पलता मंडप’देखील आहे. त्याचबरोबर विविध प्रजातींची झाडे, फुलझाडे आणि आकर्षक हिरवळदेखील या उद्यानामध्ये ठिकठिकाणी दिसते.

मोहिले

• या उद्यानातील पदपथांलगत ध्वनिक्षेपक बसविण्यात आले असून, याद्वारे दररोज ठरलेल्या वेळी मंद आवाजातील संगीताचे सूर उमटत असतात.

• या उद्यानात खुली व्यायामशाळा, योगाकेंद्र, व्हॉलीबॉल मैदान, आसनव्यवस्था इत्यादी सोईसुविधा आहेत. तसेच तीन ‘गझिबो’देखील या उद्यानामध्ये आहेत.

• ‘संगीत’ या संकल्पनेवर आधारित हे ‘थीम’ उद्यान सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांच्या स्मृतींना समर्पित आहे. अनिल मोहिले यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपट गीतांना संगीतबद्ध केले असून अनेक चित्रपटांसाठी संगीत संयोजनदेखील केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या विविध संगीत कार्यक्रमांचे संगीत संयोजनदेखील त्यांनी केले होते. विशेष म्हणजे संगीतकार मोहिले याच उद्यानाच्या परिसरात दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत असत.

• हे उद्यान दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content