Details
hegdekiran17@gmail.com
“राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याला रोखण्यावर विचार करण्याऐवजी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, या पक्षांची महाआघाडी आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यातले वाक्युद्ध दिवसेंदिवस रंगू लागले आहे.”
“राज्यात कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोजच्या रोज फोसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधत त्यांना घरी राहण्याचे आवाहन करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा निरंतर राहील, याची ग्वाही सत्ताधारी पक्षांचे नेते वेगवेगळ्या स्तरावरून देत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असंघटित मजुरांच्या प्रश्नावर सरकारने लक्ष देण्याची सूचना केली. त्यानंतर फडणवीस यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांकडून मिळणाऱ्या दंडुक्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेकडून लगेचच यावर प्रतिक्रिया उमटली. त्यांनी त्यांच्या मुखपत्रातून लगेचच फडणवीसांवर तोंडसुख घेतले. हे कायद्याचे राज्य आहे का, असे विचारणाऱ्या विरोधी पक्षाला कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री निधीबाबत सवतासुभा ठेवणाऱ्या विरोधी पक्षाने आम्हाला सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ केंद्रात असलेल्या सत्ताधारी भाजपाकडून राज्य सरकारला पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून स्पष्ट केले.”
“कोरोनाविरोधात लढणाऱ्या पण एकाकी पडलेल्या स्थलांतराच्या मार्गावर असलेल्या लोकांना भाजपाकडून मदत देण्याची मोहीम पक्षाच्या राज्य शाखेकडून करण्यात आली. मात्र, या मदतीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणिस सचीन सावंत यांनी एक पत्रक काढून भाजपावर टीका केली.”
“प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपाने कोरोनाच्या गंभीर संकटातही असंवेदनशीलता कळस गाठला आहे. गरीब, कामगार, कष्टकरी तसेच हातावर पोट असलेले लोक या संकटात होरपळले जात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. हजारो हात मदताठी पुढे आले आहेत परंतु भाजपा अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरीब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी ‘मोदीकीट’ बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे. राष्ट्रीय संकटाच्या मदतकार्यातही असे व्यक्तीस्तोम माजवण्याचा व राजकीय प्रचार करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्य लोक, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट कलाकारांसह अनेकजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल, असे सावंत म्हणाले.”
“सावंत यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून लगेचच पलटवार करण्यात आला. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी भाजपाच्या गांभीर्याची चौकशी करणाऱ्या काँग्रेसने आधी त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी उभारलेल्या राष्ट्रीय निधीमध्ये किती योगदान दिले याची माहिती द्यावी, असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला.”
“भाजपाचे राज्यातील पदाधिकारी या संकटात जनतेला मदत करण्यासाठी पक्षाच्या आपदा कोषामध्ये निधी जमा करत आहेत. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारलेल्या राष्ट्रीय निधीमध्येही भाजपाचे नेते – कार्यकर्ते योगदान देत आहेत आणि त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहेत. सरकारकडून मिळालेले वेतन सरकारी मदतनिधीतच जमा केले पाहिजे ही काँग्रेसची मागणी आश्चर्यकारक आहे. यापूर्वी शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत म्हणून त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपले वेतन त्या पक्षाच्या कोषात जमा करण्याची सूचना केली होती त्याविषयी काय म्हणायचे आहे, हे काँग्रेस पक्षाने आधी सांगावे. सरकारकडून वेतन मिळाले तरी ते मिळाल्यानंतर त्याचा कसा विनियोग करायचा हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. शिवाय भाजपाचे लोकप्रतिनिधी हे वेतन कोरोनाविरोधी लढ्यातील सेवाकार्यासाठीच पक्षाकडे देत आहेत, याची नोंद घ्यावी, असे ते म्हणाले.”
“भाजपा अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरीब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी ‘मोदी कीट’ बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. आपण त्याचे स्वागत करतो कारण त्या निमित्ताने भाजपा मदत कार्य करत असल्याचे मान्य केले, असा टोला भांडारी यांनी लगावला.”
“दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समाज माध्यमातून काही जण मुद्दाम आपली बदनामी करत असल्याचा दावा केला आहे. सांगलीच्या इस्लापूरमधील कोरोनाबाधित मनरे कुटुंबीय इस्लामपूरमध्ये कधी दाखल झालं याची मला कल्पनाही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ४ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे मला कळवले. माझ्याविरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन मला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.”