HomeArchiveलॉकडाऊन पुन्हा स्थानिक...

लॉकडाऊन पुन्हा स्थानिक स्तरावरच!

Details
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“मिशन बिगिन अगेन, या नावाखाली सुरू करण्यात आलेला तथाकथित अनलॉकडाऊनचे भवितव्य पुन्हा एकदा स्थानिक स्तरावर सोपविण्यात आले आहे. कोरोनामुळे राज्यात विविध महानगरांमध्ये तसेच शहरांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर शासनस्तरावर घेतलेल्या निर्णयांत हवे तसे बदल करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला देण्यात आले होते. त्यामुळेच प्रत्येक शहरांत वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने सवलतीही जाहीर करण्यात आल्या होत्या. राज्यशासनाने आज जारी केलेल्या नियमावलीतही पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र गोंधळात भरच पडण्याची शक्यता आहे.”
 
“आज मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, याआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात आली. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील.”
 
“या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरू ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरू राहील.”
 
“ऑगस्ट २०२०पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरू करण्यास संमती नसेल. या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरू ठेवण्यास संमती असेल. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तू व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरू राहील. सध्या सुरू असलेले उद्योग सुरू राहतील.”
 
“संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरू राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सूनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरू राहतील. होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरू राहतील. ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधित कामे सुरू राहतील. सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरू राहतील.”
  

 
“स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरू राहतील. गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरू ठेवता येतील. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल. लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही. 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील. काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.”
 
“वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल. शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल. राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल. गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पूल) परवानगी नसेल.”
 
“टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील. कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.”
 
“उर्वरित राज्यभरात या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील. आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरूपाचा राहील. अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरू ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील. खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार परवानगी असेल.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content