Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
राज्य मंत्रिमंडळातल्या तब्बल १६ मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असताना त्यापैकी सर्वांनी खाजगी रूग्णालयांत उपचार घेतले असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारी रूग्णालयात आपल्यावरील कोरोनाचे उपचार चालविल्याने सरकारी आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
“दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेचच ते मुंबईतल्या सेंट जॉर्जेस रूग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारमधील १६ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे आदींचा समावेश आहे. या सर्वांनी उपचारांसाठी सरकारी रूग्णालयांवर फारसा भरवसा न ठेवता खाजगी रूग्णालयांचा आसरा घेतला. मात्र, फडणवीस यांनी मात्र सरकारी आरोग्य यंत्रणेवर पूर्ण विश्वास टाकला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.”
“आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही कोरोनावरील उपचारांसाठी ब्रीच कॅन्डी रूग्णालय गाठले. लॉकडाऊनच्या काळातही नियमित आणि वेळेत येणारे अजित पवार संपूर्ण मंत्रालय ओसाड असताना सकाळी नऊ वाजताच मंत्रालयात येऊन काम सुरू करायचे. कोरोना काळात अजित पवार सगळ्यात जास्त काळजी घेत होते, मात्र आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.”
“बैठकांना गर्दी होऊ नये म्हणून पवार यांचे कार्यालय विशेष काळजी घ्यायचे. त्यांच्या कार्यालयात मशीन आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक होते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी याकडे विशेष लक्ष ठेवून असायचे. अगदी कार्यालयात येणारे कागद, फाईलदेखील सॅनिटाईज करायला विशेष मशीन लावण्यात आले होते. पत्रकारांच्या माईकवर सॅनिटायझर शिंपडून मगच ते उत्तर द्यायचे. कोणी फोटो काढायला उभे राहिले तरी अंतर ठेवून फोटो काढायचे.”
“राष्ट्रवादी कार्यालयातदेखील जनता दरबार सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवत अजित पवार लोकांसाठी कार्यालयात उपलब्ध असायचे. मात्र, मतदारसंघ, मेट्रोच्या कामाची पाहणी, अतिवृष्टी अशावेळी पाहणी करायला गेल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. अजित पवार त्यावेळी लोकांमध्ये जात होते. शेवटचा दौरा त्यांनी केला तो सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात. सोलापूरला बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर अजित पवार मात्र विलगीकरणात गेले. त्यांना थकवा जाणवत होता, खोकला होता. त्यांनी पहिली चाचणी केली ती निगेटिव्ह आली तरी ते विलगीकरणात होते. त्यावरुनही चर्चा सुरु होत्या. अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. आज सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाल्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृतरित्या अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.”