कोविड–१९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्याया, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
पालिका मुख्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करताना उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, व्हॅक्सिन ऑन व्हिल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक संगीता मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोविड–१९चा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीतजास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरू करण्यात आले आहेत.
यासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांनी मुंबई महापालिकेसमवेत भागीदारी केली आहे. इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या तसेच कोविड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम या भागीदारीतून हाती घेण्यात आला आहे. यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देहविक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाजघटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधित बिगरशासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
या समाजघटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण ४ फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे. त्यामुळे कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे.
आज पहिल्या दिवशी म. जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० विक्रेते आणि देहविक्रय करणाऱ्या २५ महिला यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी संबंधित मनुष्यबळाला प्रशिक्षणदेखील दिले जात आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये, संबंधित समाजघटकांच्या परिसरात महापालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. १२ ऑगस्टपासून या रितीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील.

