Homeमुंबई स्पेशलगोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातली...

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातली ३५ अतिक्रमणे पाडली!

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असलेल्या गोरेगांव–मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने आज काढून टाकली.

ही अतिक्रमणे हटविल्याने या प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली असून प्रकल्प निर्मितीला वेग मिळणार आहे. आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी समस्येतून दिलासा देण्यासाठी गोरेगांव–मुलुंड जोडरस्ता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. पी/ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी (फिल्मसिटी) रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे होती. त्यापैकी, पहिल्या टप्प्यात जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील ५२ अतिक्रमित बांधकामे २ वर्षांपूर्वी काढली होती.

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या आदेशानुसार, सदर प्रकल्पाला वेग देण्याच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्यात ३५ अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने काल (२१ ऑक्टोबर २०२१) पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूची जागा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे. या जागेत सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाचा रस्ता तसेच पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे काम गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता विभागामार्फत त्वरित सुरू करण्यात येईल.

या प्रकल्पाचा भाग म्हणून जनरल अरुणकुमार वैद्य रस्ता ते चित्रनगरी रस्ता असा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रत्नागिरी हॉटेल चौकात प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ असा एकूण ६ मार्गिकांचा असेल. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठीदेखील आता जागा उपलब्ध झाली आहे. सदर उड्डाणपूल तसेच मुलुंडमधील उड्डाणपूल बांधकामासाठी एकत्रित निविदा मागवून पात्र निविदाकारांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन लवकरच उड्डाणपुलाचे बांधकामदेखील सुरू होणार आहे.

उपायुक्त (परिमंडळ ४) भारत मराठे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पूर्ण केली. दोन जेसीबी संयंत्रांच्या सहाय्याने परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता तांबे, दुय्यम अभियंता धर्माधिकारी व कनिष्ठ अभियंता येडले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चित्रनगरी मार्गावरील ही ३५ अनधिकृत बांधकामे काढली. ही कारवाई करताना दिंडोशी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह २५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अखेरची शिल्लक १४ अतिक्रमित बांधकामे लवकरच प्राधान्याने काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content