भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, माजी कुलगुरू, भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य तसेच राष्ट्रपतीनियुक्त माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाच्या २००व्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल मुंबईत राजभवन येथे झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यामुळे डॉ. जाधव यांच्याप्रमाणेच करोडो उपेक्षित लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाची दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणे औचित्यपूर्ण आहे, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. जाधव यांचे ‘आमचा बाप…’ हे दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक ठरल्याबद्दल तसेच ते मराठी भाषेतील पहिले ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’ ठरल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

मानव संस्कृतीच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अद्वितीय युगपुरुष होते. शतकानुशतके चालणाऱ्या अन्यायकारी जातीयवादी समाजव्यवस्थेच्या विरुद्ध ते उभे ठाकले. भारत तसेच अमेरिकेत उच्चशिक्षण घेतल्यानंतर ते आपल्या उपेक्षित बांधवांच्या मुक्तीसाठी भारतात परतले. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहण्यात तसेच आज जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्यात डॉ. आंबेडकर यांचे योगदान अनमोल आहे, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

डॉ. जाधव आजच्या काळातील थोर लेखक, विचारवंत असून त्यांनी देशातील प्रगतिशील विचारधारेला समृद्ध केले आहे. ‘आमचा बाप आन आम्ही’ हे पुस्तक १४ भाषांमध्ये अनुवादित झाले असून आता त्याचे ऑडिओ बुक व्हावे तसेच ब्रेल लिपीतून त्याची आवृत्ती निघावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
लौकिकार्थाने जरी ‘आमचा बाप…’ हा आपल्या पुस्तकाचा नायक असला तरी, खऱ्या अर्थाने या पुस्तकाचे ‘मूकनायक’ डॉ. आंबेडकर हेच असल्याचे डॉ. जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या पुस्तकाच्या आजवर देशविदेशात ८ लाख प्रती विकल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला डॉ. जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव, ‘ग्रंथाली’ प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर तसेच डॉ. जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

