पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्चला अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्तीचे काम आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार असल्याने उद्या मंगळवारी एका दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाणीपातळी वाढण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात येत आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रसासनाने केले आहे.